उत्साह आणि आत्मविश्वास ; शिवतेजसिंहांच्या नव्या पर्वास प्रारंभ, शिवकिर्ती बंगला येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : नगरपरिषदांच्या निवडणुका अद्याप जाहिर झाल्या नसल्या तरी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरूवात केली असून त्यांच्या उत्साही आणि आत्मविश्वाने भरपूर असलेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोष निर्माण झाला आहे. शिवतेजसिंहांच्या नव्या पर्वाचा हा प्रारंभ असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
अकलूज नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी धडाका सुरू केला असून, त्याची सुरूवात शिवकिर्ती बंगला येथे आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीतून करण्यात आली. आगामी काळात प्रत्येक बुथवर बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सक्रिय होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत प्रमुख पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या संघर्षाची आठवण करून देतानाच नगरपरिषद झाल्यापासून कोट्यावधी रूपयांची विकासकामे झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी 211 कोटी रूपयांची योजना, 121 कोटींची अंडरग्राउंड कटर, नगरोत्थान योजनेतून 119 कोटींचे रस्ते, याशिवाय 50 किलोमिटरचे रस्ते, 50 किलो मिटरच्या गटारी, स्ट्रिट लाईट, बायपास रोडचे सुशोभिकरण अशा प्रमुख विकासकामांची यादी वाचून दाखवली.
यावेळी अकलूज नगरपरिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीची दिशा स्पष्ट करण्यात आली. शिवतेजसिंह यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आगामी रणनीती, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. ही केवळ चर्चा नाही, तर अकलूजच्या नवविकासाची सुरुवात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि लढाऊ बाणा निर्माण करणारी ही बैठक अत्यंत प्रेरणादायी ठरली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजूट, निष्ठा आणि जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवतेजसिंह यांच्या स्पष्ट आणि ठाम नेतृत्वामुळे संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
या बैठकीत प्रत्येक बुथवर कार्यकर्ता बैठक घेण्याचा आणि घराघरात पोहोचून मतदारांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवकिर्ती बंगल्यावरून सुरू झालेला हा नवा राजकीय प्रवास अकलूजच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.