माळशिरस तालुक्यात होणार मिनी औद्योगिक वसाहत ; प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार सादर – आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व आ.राम सातपुते यांच्या मागणीनंतर उद्योगमंत्र्यांच्या आश्वासन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यात मिनी औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमिनीसाठी प्रस्ताव सादर करावा अशी विनंती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांनी यासंदर्भात उद्योग मंत्र्यांकडे मागणी केली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या लेटर पॅडवर आमदार रणजितसिंह व आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात मिनी औद्योगिक वसाहत मंजूर व्हावी त्यासाठी सदाशिवनगर , पुरंदावडे , येळीव आणि माळशिरस या चार गावांमध्ये शेती महामंडळाकडील 210 एकर जमीन उपलब्ध होणे शक्य आहे त्यासाठी प्रयत्न व्हावा व त्या जमिनीवर औद्योगिक वसाहत मंजूर व्हावी अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे .रणजितसिंह मोहिते पाटील व राम सातपुते या दोन्ही आमदारांच्या मागणीनुसार उदय सामंत यांनी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे यासंदर्भातील प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचे लेखी म्हणणे पाठवले आहे .त्यामुळे माळशिरस तालुक्यात मिनी औद्योगिक वसाहतीला जमीन मिळण्याच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत .
सन 2011 च्या जनगणनेनुसार माळशिरस तालुक्याची लोकसंख्या सुमारे 4 लाख 85 हजार इतकी असून आतापर्यंतची वाढती लोकसंख्या लक्षात घेता तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे .बेरोजगारांच्य हाताला रोजगार उपलब्ध होण्यासाठी येथे मिनी औद्योगिक वसाहत होणे अत्यंत गरजेचे आहे . सदाशिवनगर येथील शेती महामंडळाच्या अधिकारात असलेली चार गावातील 210 एकर जमीन उपलब्ध करता येईल हे या दोन्ही आमदारांनी उद्योगमंत्र्यांना पटवून दिले आहे .ही जमीन शेती महामंडळाची असल्याने शेतकर्यांकडून जमीन संपादित करावी लागणार नाही . तसेच ही जमीन महामार्ग लगत असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने विकसित झालेले राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उपयोगी येणार आहे . त्याशिवाय या औद्योगिक वसाहतीसाठी नीरा उजवा कालव्याचे पाणी उपलब्ध होणे सहज शक्य आहे . माळशिरस तालुक्याच्या लगत सातारा जिल्ह्यातील मान व फलटण हे तालुके येतात या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार योजना युवकांना देखील या प्रस्तावित औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार उपलब्ध होईल असे आमदार रणजितसिंह व आमदार राम सातपुते यांचे म्हणणे आहे .त्यानुसार आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जागा उपलब्ध होण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाणार आहे .
माळशिरस तालुक्यात मिनी औद्योगिक वसाहत होण्यासाठी जागेची गरज आहे .सदाशिवनगर मळ्यातील शेती महामंडळाची जागा यासाठी सहज उपलब्ध होणे शक्य आहे . त्यामुळे भूसंपादनाची कोणतेही अडचण येणार नाही .यासाठी उद्योग मंत्र्यांनी महसूलमंत्र्यांना लेखी कळवून येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमीन मिळवण्या संदर्भात आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याचे सांगितले आहे . - रणजितसिंह मोहिते पाटील , आमदार