अपूर्ण रस्ते व पुलांमुळे वाढते अपघात; खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील अपूर्ण रस्ते व रखडलेली पुलांची कामे यामुळे प्रवाशांचे हाल आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासमवेत विशेष बैठक घेतली.
या बैठकीस बावी, सोलंकरवाडी, बागेची वाडी, रोपळे, पिलीव, कुसमोड, काळमवाडी फाटा, उपरी, भाळवणी, वाकी, धोंडेवाडी (सोलापूर) आणि म्हसवड, धुळदेव, मनकर्णवाडी (सातारा) येथील नागरिकांच्या तक्रारींचा संदर्भ होता. रस्ते व पूल अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडी, प्रवासातील विलंब आणि वारंवार होणारे अपघात नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहेत.
खा. मोहिते-पाटील यांनी अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कामांना गती देऊन कालबद्ध आराखडा तयार करा. स्थानिक प्रशासन आणि महामंडळ यांच्यात समन्वय साधा आणि नागरिकांना दिलासा द्या.”
या बैठकीत खा. मोहिते-पाटील यांनी खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या:
- अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावेत
- जमीन अधिग्रहणाच्या रखडलेल्या मोबदल्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत
- कामांसाठी स्पष्ट वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करावी
बैठकीला उपस्थित स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधीही आपल्या मागण्या मांडण्यासाठी उपस्थित होते.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत, कामांमध्ये गती येईल आणि समस्या मार्गी लागतील, असे आश्वासन दिले.



