माळशिरस पंचायत समितीमध्ये नूतन गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे रुजू ; मंजूर रेखांकन घोटाळ्याच्या चौकशीकडे जनतेचे लक्ष

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास कार्यालयात नवे नेतृत्व रूजू झाले असून रघुनाथ पांढरे यांनी नुकतेच गटविकास अधिकारीपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला आहे. मावळते गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभार स्वीकारताना पंचायत समिती कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहून नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत करत पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर रघुनाथ पांढरे यांनी तात्काळ आढावा बैठक घेतली. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले की, पंचायत समितीचे कामकाज अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक व जनहितार्थ असावे. नागरिकांच्या समस्या कमीत कमी वेळेत निकाली निघाव्यात, सेवा-पुरवठ्यात दिरंगाई होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महर्षि डिजीटल न्यूजने गेल्या काही महिन्यांपासून “मंजूर रेखांकन घोटाळा” या प्रकरणावर वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये मंजूर रेखांकन व त्यासंदर्भातील अनियमितता उघड करण्यात आली होती. यामुळे सार्वजनिक संताप उसळला होता. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मावळते गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांची बदली केल्याचे सांगण्यात येत आहे.
या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि सरकारी यंत्रणेत पारदर्शकता यावी अशी अपेक्षा नूतन गटविकास अधिकाऱ्यांकडून नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा महर्षि डिजीटल न्यूजच्या माध्यमातून यापुढेही सुरू राहणार आहे. या माध्यमाने समाजहिताच्या दृष्टीने जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
रघुनाथ पांढरे हे अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीनंतर माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारात सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा ग्रामविकास क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. पंचायत समितीचे कामकाज गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, या दिशेने पांढरे यांचे नेतृत्व प्रभावी ठरेल, अशी आशा आहे.
– सागर खरात 9730789888



