मराठा समाजाने आधुनिकतेकडे वाटचाल करावी – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचे आवाहन ; मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : “मराठा समाजाने जुन्या रूढी परंपरांना सोडून नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि समाज प्रगतीच्या दिशेने पुढे जावा,” असे मत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. ते अकलूजमधील शंकरनगर येथील स्मृती भवन येथे मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय घोगरे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर, शिवतेजसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनाच्या उद्घाटनपूर्व सत्रात मराठा सेवा संघ व ३३ कक्ष बळकटीकरण व पुनर्बांधणी या विषयावर अॅड. खेडेकर, कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके, धनंजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भाषणात, “मराठा समाजातील अशिक्षितपणा, गरीबी व आर्थिक दुर्बलतेच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात स्व. बाळासाहेब कदम, उत्तमराव माने शेंडगे यांच्यासह अनेकांनी मेहनत घेऊन आज संघ हा वटवृक्ष बनला आहे,” असे प्रतिपादन केले.
आपल्या मनोगतात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, “मराठा समाजातील तरुणांनी पारंपरिक शेतीव्यवसायाबरोबरच स्टार्टअप्स, उद्योजकता व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. जुन्या-नव्या विचारांचा समतोल राखत संघटनात्मक बांधणी झाली तर नवी पिढी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होईल.”
या कार्यक्रमास शिवतेजसिंह मोहिते-पाटील, निर्मलकुमार देशमुख, कामाजी पवार, नेताजी गोरे, मधुकरराव मेहेकरे, अर्जुनराव तनपुरे, मनोज आखरे, राजेंद्रसिंह पाटील, तसेच सोलापूर जिल्हा, पंढरपूर विभाग व माळशिरस तालुका येथील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात “अकलूज इतिहास व विकास” या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. शाहीर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला. आशा मोरजकर यांनी महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर आधारित एकपात्री “श्री राज्ञी सखी ज्योति” प्रयोग सादर केला.

सांयंकाळी माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडतर्फे काढण्यात आलेल्या संस्कृती यात्रेच्या माध्यमातून महिलांनी सदूभाऊ चौक ते स्मृती भवन अशी पालखी यात्रा काढली. या पालखीमध्ये जिजाऊंचा फोटो व संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. या यात्रेमध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, अॅड. खेडेकर यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
कार्यक्रमाचा समारोप “जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा” या सांस्कृतिक सादरीकरणाने करण्यात आला.
मराठा समाजाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल असे हे अधिवेशन, वैचारिक जागृती आणि संघटनात्मक बळकटीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.



