“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार ; दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचात मानाचा तुरा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सोलापूरचे भूमिपुत्र व सध्या पुण्यात स्थायिक असलेले अल्ताफ दादासाहेब शेख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या ‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान – दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.
या चित्रपटात शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमदार आणि माजी मंत्री दिवंगत गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या कार्यमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अल्ताफ शेख यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘कर्मयोगी आबासाहेब’ या चित्रपटाला आतापर्यंत ३० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, तिकीट खिडकीवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाई रेंज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे.
या चित्रपटाचे प्रदर्शन Amsterdam Lift-Off आणि Crownwood International Film Festival मध्ये प्रीमियर स्वरूपात करण्यात आले होते. त्यानंतर चित्रपटाने अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. त्यापैकी काही मानाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे:
- बेंगळुरू इंटरनॅशनल पॅनोरामा फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- यूके-सिडनी लिफ्ट ऑफ फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- लाहोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- स्वीडन फायनलिस्ट फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- क्राऊन वूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- भारत नॅशनल ऍवॉर्ड
- स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड
- तमिळनाडू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- गोल्डन लायन फिल्म फेस्टिव्हल ऍवॉर्ड
- वेस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक)
आता या यशोशिखरावर दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे अल्ताफ शेख यांचे कौतुक सर्वत्र होत आहे. १ मे २०२५ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या भव्य समारंभात, मान्यवरांच्या उपस्थितीत, हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.



