महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना सन्मान देणे ही केवळ औपचारिकता नसून लोकांच्या निर्णयाचा सन्मान असतो. परंतु सांगोला येथे बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात घडलेला प्रकार या सभ्यतेला तडा देणारा ठरला आहे. या कार्यक्रमात विद्यमान खासदारांना बसण्यासाठी खुर्चीही देण्यात आली नाही, तर माजी आमदार आणि माजी खासदार मात्र आरामात खुर्चीवर बसलेले होते. या प्रकाराने राजकीय संस्कारांचा अभाव आणि व्यक्तिगत अहंकार उघड झाला आहे.लोकशाहीत जनतेच्या मताने निवडून आलेला प्रतिनिधी जनतेच्या सन्मानाचा प्रतीक असतो. तेथील विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना खुर्ची न देऊन उभे ठेवणे हे केवळ त्यांच्या व्यक्तीगत सन्मानाचा अपमान नसून लोकशाही प्रक्रियेचा आणि जनतेच्या मताचा अपमान आहे. विरोधक असो वा समर्थक, पक्षभेद विसरून लोकशाहीतील पदांचा आदर राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते परंतु व्यक्तिगत अहंकारात बुडालेल्या माजी आमदार व माजी खासदारांना मात्र याचा विसर पडल्याचे पहायला मिळाले.
राजकारणात व्यक्तीपेक्षा पदाला महत्त्व दिले जाते. पदानुसार मान-सन्मान देणे ही परंपरा आहे. आजचा विरोधक उद्याचा सहकारी होऊ शकतो, त्यामुळे वैयक्तिक वाद बाजूला ठेवून राजकीय सौजन्य पाळले पाहिजे. विद्यमान खासदारांना खुर्ची न देऊन माजी आमदार आणि माजी खासदारांना बसण्याची व्यवस्था करणे म्हणजे फक्त व्यक्तीगत संबंध जपण्यासाठी केलेला प्रयत्न होता का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
हा प्रकार केवळ चुकून घडलेला आहे की जाणूनबुजून केलेला अपमान आहे, यावर चर्चा रंगणे स्वाभाविक आहे. आयोजन करणाऱ्यांची राजकीय निष्ठा आणि त्यातून आलेला पक्षपातीपणा यातून हा अपमान झाला असेल, तर ते अधिक चिंताजनक आहे. कारण यामुळे राजकीय कटुता निर्माण होऊ शकते आणि लोकप्रतिनिधींमधील परस्पर आदराची भावना नष्ट होऊ शकते.
अशा घटनांमुळे असभ्य राजकारणाची संस्कृती बळावत चालली आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसून, जनतेच्या हिताचे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारे व्यासपीठ आहे. राजकीय भेदभाव बाजूला ठेवून, पदाचा सन्मान करणे हीच खरी लोकशाही आहे.
सांगोला येथील या संतापजनक घटनेने राजकारणातील सभ्यतेचा मुखवटा निघून असभ्यपणा समोर आला आहे. ही संस्कृती बदलायची असेल, तर राजकीय नेत्यांनी वैयक्तिक वाद आणि पक्षभेद विसरून एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. राजकारणाची पातळी उंचावण्यासाठी या असभ्यतेला आळा घालणे आवश्यक आहे.
Back to top button
error: Content is protected !!