अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई ; 17 होड्या नष्ट , एक ट्रॅक्टर जप्त
महर्षि डिजीटल न्यूज
पंढरपूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणार्या 17 लाकडी होड्या कटरच्या साह्याने नष्ट केल्या तर अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टरवर कारवाई केली असून, सदर ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला आहे. तसेच दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी पंढरपूर, इसबावी, शिरढोण, चिंचोली भोसे दरम्यान असणार्या भीमा नदी पात्रात वाळू चोरी करण्यासाठी वापरल्या जाणार्या एकूण 12 लाकडी होड्या कटरच्या साह्याने कापून नादुरुस्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत, तसेच चळे येथे वाळू चोरीसाठी वापरण्यात येणार्या 05 लाकडी होड्या जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.
या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, प्रमोद खंडागळे , महेश सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे व पंढरपूर शहरचे पोलीस कर्मचारी सहभागी होते.