Latest News

खोट्या जातीच्या दाखल्याद्वारे फसवणूक वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज /सागर खरात
अकलूज : विधानसभा निवडणुकी दरम्यान खोट्या जातीच्या दाखल्याचा मुद्दा गाजत असतानाच वेळापूर पोलिस स्टेशनमध्ये खोट्या जातीच्या दाखल्याद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या प्रमाणे वेळापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सेवा निवृत्त सहाय्यक फौजदार नारायण पुंडलिक परचंडराव रा.भटुंबरे ता.पंढरपूर यांच्या विरूध्द सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी आदेश प्राप्त झाल्याने वेळापूर पोलिस स्टेशनमध्ये परचंडराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार नारायण पुंडलिक परचंडराव यांनी पोलीस खात्यातील नोकरी मिळवण्यासाठी महादेव कोळी या जातीचा बोगस दाखला जोडला असल्याची तक्रार सेवानिवृत्त पोलिस हवालदार लक्ष्मण पिंगळे यांनी केली होती. जात पडताळणी समितीकडे परचंडराव यांची सर्व खरी आणि खोटी कागदपत्रे सादर करून चौकशी करण्याची विनंती केली होती. यावर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती च्या पुणे विभागीय कार्यालयाने सर्व कागदपत्रांची चौकशी व पडताळणी करून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार नारायण पुंडलिक परचंडराव हे कोळी महादेव, अनुसूचित जमातीचे नाहीत. त्यामुळे त्यांचा कोळी महादेव, अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात येत असल्याबाबतचा आदेश निर्गमित केला होता. शिवाय अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 च्या कलम 10 व 11 अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक व वेळापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी वेळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. 267/2024 भा.द.वि.क 465, 468, 471, 420 सह महाराष्ट्र अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग अधि 2000 च्या प्र.11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!