पाच जणांकडून तरुणावर दगड, पेव्हर ब्लॉक व लाथाबुक्यांनी हल्ला ; अकलूज पोलिसात गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज शहरात पांडुरंग कलेक्शन दुकानासमोर किरकोळ वादातून पाच जणांनी एका तरुणावर दगड, पेव्हर ब्लॉक व लाथाबुक्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून अकलूज पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गुरुदेव रमेश आरडे (वय ३२, रा. महर्षि कॉलनी, आझाद चौक, अकलूज) हे सध्या आपुलकी हॉस्पिटल येथे उपचार घेत असून, त्यांनी दिलेल्या जबाबावरून अकलूज पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी आरडे हे सॉफ्टवेअर टेस्टिंगचे काम पाहतात. घटनेच्या दिवशी रात्री ते आपल्या मित्र किशोर साठे याच्यासह मुलासाठी मेडिकलमधून डायपर घेण्यासाठी गेले होते. ते दोघे पांडुरंग कलेक्शनसमोर उभे असताना, त्यांच्या नातेवाईकांची मोटारसायकल आणि दुसरी मोटारसायकल (एमएच ४५ एटी ५७०६) यांच्यात धडक झाली.
या किरकोळ अपघातानंतर आरडे आणि त्यांचा मित्र किशोर यांनी समजावून सांगत असतानाच मोटारसायकलवरील चालक स्वप्निल नितीन भोसले याने फोन करून साहील भोसले, नितीन भोसले आणि संचित खरे (काळू) यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर साहील भोसले याने शिवीगाळ करत दगड उचलून आरडे यांच्यावर हल्ला केला. स्वप्निल भोसले याने पेव्हर ब्लॉकने आरडे यांच्या डोक्याच्या व नाकाच्या डाव्या बाजूस, कानावर प्रहार केला. संचित खरे यानेही दगडाने पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. तसेच नितीन भोसले व स्नेहल भोसले यांनीही लाथाबुक्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीने आपल्या जबाबात नमूद केले आहे.
या घटनेत आरडे गंभीर जखमी झाले असून, त्यांना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे हलविण्यासाठी सांगितले. तथापि, तेथील गंभीरित्या जखमी असल्यामुळे त्यांना अकलूज येथील आपुलकी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले
या प्रकरणी स्वप्निल नितीन भोसले, साहील भोसले, संचित खरे (काळू), नितीन भोसले व स्नेहल भोसले सर्व रा. अकलूज ता. माळशिरस यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व गंभीर दुखापतीचा गुन्हा अकलूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिस करत आहेत.



