857 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव शासकीय यंत्रणांनी तात्काळ द्यावेत – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
महर्षि डिजीटल न्यूज
सोलापूर : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी उपयोजना साठी 4 कोटी 28 लाख असे एकूण 857 कोटी 28 लाख निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून जास्तीत जास्त विकास कामांचे कार्यारंभ आदेश दिले गेले पाहिजेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, उपायुक्त नियोजन संजय कोलगणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता 15 ते 20 सप्टेंबर 2024 दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही अत्यंत गतीने करावी, असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 अंतर्गत कृषी व संलग्न सेवा 51 कोटी, ग्राम विकास 61 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास 125 कोटी, पाटबंधारे व पुर नियंत्रण 63 कोटी, ऊर्जा विकास 56 कोटी 40 लाख, रस्ते विकास 76 कोटी, सामान्य शिक्षण 42 कोटी, आरोग्य क्षेत्र 62.65 कोटी, तीर्थक्षेत्र, पर्यटन, गड किल्ले 43.75 कोटी, महिला बाल विकास 20.86 कोटी व्यायामशळा व क्रीडांगण विकास 7 कोटी अशा महत्त्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती पालकमंत्री श्री पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट सांगोला हे दोन आकांक्षीत तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे यासाठी दहा कोटीचा निधी ठेवण्यात आलेला आहे. तसेच ज्या यंत्रणांनी अद्याप सन 2023- 24 मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधीची मागणी केली नाही ती मागणी लवकरात लवकर करावी. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाहीत त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देशित केले.
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनांची संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मंजुरी दिलेली प्रकरणे, प्रत्यक्ष पूर्ण झालेली घरकुलांची संख्या, अपूर्ण घरकुलांची संख्या व त्याची कारणे आदी बाबीची सविस्तर माहिती पुढील आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. महापालिकेने रमाई घरकुल योजनेअंतर्गत 2700 घरांची कामे पूर्ण केलेली आहेत परंतु अपूर्ण घरकुलांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने महापालिकेने यामध्ये अत्यंत गतीने काम करून संबंधित लाभार्थ्यांची घरकुल पूर्ण करण्याची कारवाई केली पाहिजे असे त्यांनी सूचित केले.
महापालिकेच्या दुहेरी पाईपलाईन तसेच उड्डाणपुलेच्या कामकाजाचाही पालकमंत्री पाटील यांनी आढावा घेऊन याबाबत स्वतंत्र बैठका घेऊन ही कामे मार्गी लावण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडील विविध कामाच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केली. अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांची संबंधित सदस्य सोबत भेट घेऊ असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने त्यांच्याकडील विविध विकासात्मक कामाच्या मंजूर निधीतून आवश्यक कामे त्वरित प्रस्तावित करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कृषी सेवा केंद्रातून औषध घेऊन फवारणी केल्याने पिकांची नुकसान भरपाई पिकांचे नुकसान झालेले आहे अशा कृषी सेवा केंद्राची तपासणी करावी तसेच पिकांचा तपासणी अहवाल मागून घ्यावा असं संबंधित कृषी सेवा केंद्र सील करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी कृषी विभागाला दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील विषयाची माहिती सादर केली. जिल्हा परिषद योजना सन 2023- 24 चा माहे मार्च 2024 अखेर सर्वसाधारण योजना 590 कोटी अनुसूचित जाती उपायोजना 150.98 कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 3.77 कोटी असा एकूण मंजूर निधीच्या 745.28 कोटीच्या अंतर्गत 744.75 कोटी खर्च झाल्याची माहिती देऊन खर्चाची टक्केवारी 99.99% इतके असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा करण्यात आलेला असून जिल्ह्यातील 4 लाख 85 हजर 585 शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर 96 कोटी जमा करण्यात आलेले आहेत. तसेच आधार सीडिंग नसणे व अन्य कारणामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाही त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोलापूर महापालिकेच्या रामवाडी येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पोस्टाच्या अनुपस्थिती बबत माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली. तसेच सोलापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे 110 किलोमीटर पैकी 97 किलोमीटरचे पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले असून जॅकवेलचे 73 टक्के काम पूर्ण झालेले आहे तर पंपाचे काम ही पूर्ण झाल्याचे माहिती श्रीमती उगले यांनी देऊन तीस नोव्हेंबर 2024 पर्यंत दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण होईल. तसेच शहरातील उड्डाण पुलाच्या कामाच्या अनुषंगाने भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व अशासकीय सदस्यांनी पुढील प्रश्न, सूचना मांडल्या व विकासासाठी निधी देण्याची मागणी केली…
सोलापूर महापालिका अंतर्गत रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे कामे त्वरित पूर्ण व्हावीत, रामवाडी येथील प्रस्तुती गृहासाठी वैद्यकीय स्टाफ मिळावा, अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय कार्यवाही बंद करावी, दुहेरी पाईपलाईनचे काम, शहरातील उड्डाणपुलाचे काम, वीज वितरण कंपनीने रोहित्र उपलब्ध करणे व शेती पंप अनुषंगिक कामे, भीमा नदीतून वाहून जाणारे पाणी अडवणे, उजनी धरण जवळपास शंभर टक्के भरलेले आहे खालील भागाला पाणी सोडणे, पी एम किसान योजनेचे पैसे जमा करणे, अतिवृष्टी व टंचाईचे अनुदान शेतकऱ्यांना देणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे भव्य स्मारक बांधकाम गतीने पूर्ण करण्याबाबत लक्ष देणे या व अन्य विकासात्मक मागण्या सदस्यांनी केल्या व त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा असे सांगितले.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बबनदादा शिंदे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, यशवंत माने यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे आदी तसेच नियोजन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समिती सदस्यांचे स्वागत केले. नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयांची माहिती त्यांनी सादर केली.