पालखी मार्गस्थ होताच अकलूज नगरपरिषदेमार्फत गाव चकाचक ; 180 कर्मचार्यांनी केली 17 टन कचर्याची सफाई
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : पालखी मार्गावरील कोणत्याही गावातून पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छतेची खूप मोठी समस्या निर्माण होते. परंतु अकलूज नगपरिषदेने हे आव्हान स्विकारून केवळ काही तासातच अकलूज चकाचक केल्याने गावातील नागरीकांतून अकलूज नगरपरिषदेच्या कर्मचार्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी चे शुक्रवार दि.12 रोजी अकलूज मध्ये आगमन झाले होते. पालखी बरोबरच्या लाखो वारकर्यांना सर्वतोपरी सुविधा देताना अकलूज नगरपरिषदेचे कर्मचारी रात्रंदिवस एक करून परीश्रम घेत होते. कालचा मुक्काम आटोपून आज सकाळी पालखीने माळीनगर कडे प्रस्थान केले.
संत तुकारामांची पालखी मार्गस्थ होताच अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या सुमारे 180 कर्मचार्यांनी 22 घंटागाड्या व पाणी टँकर, मैला टँकर च्या सहाय्याने 25 ते 30 किमी चे रस्ते व गल्ली बोळा तसेच जिथे जिथे दिंड्या मुक्काम होत्या अशा सर्व शाळा केवळ काही तासातच चकाचक केल्या. या साफसफाईमध्ये सुमारे 17 टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छते नंतर जंतुनाशक पावडर, फोगिंग मशीनच्या साहाय्याने फवारणी करण्यात आली. स्वच्छता करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांना हँड ग्लोज व मास्क देण्यात आले.
कमी वेळात अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नियोजनबध्द साफसफाई केल्याने अकलूज परिसरातील नागरीकांतून त्यांचे व कर्मचार्यांचे कौतुक करण्यात येत आहे.