ना भेटी… ना गाठी… ना कधी केली “स्माईल” ; एफ आणि एम ची रेंज नसल्यास कसा आमदार होईल
महर्षि डिजीटल न्यूज/ सागर खरात
अकलूज : लोकसभेचा निकाल लागून महिनाही लोटला नाही तोवरच अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. काहीही काम न करता जनतेपुढे आपला चेहरा जावा यासाठी अनेक प्रकारच्या क्लृप्त्या लढवल्या जात असतानाच एका महाशयांनी तर पत्रकारांमध्ये उभी फूट पाडून आपल्या सलग्न असलेल्या पत्रकारांना भल्या मोठ्या देणगीच आमिष दाखवून बातम्या लावून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या तशी जास्तच असते. वेगवेगळ्या संघटनांच्या व चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्यांना जनतेची सेवा करण्यासाठी आमदार होण्याचे स्वप्न पडणे हे स्वागतार्ह आहे. परंतु कधीही जन माणसाशी संपर्क नसलेले मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून उभे ठाकलेले दिसू लागल्याने हास्यास्पद चर्चा सुरू झाल्या आहेत.
आजवर एकाही सामाजिक उपक्रमासाठी किंवा समाजसेवेच्या बातमीसाठी पत्रकार परिषद न घेतलेल्यांना विधानसभा निवडणूक जवळ येताच चेहऱ्यावर अचानक “स्माईल” आली आहे. “एफ” आणि “एम” (फिमेल आणि मेल) च्या नेटवर्कची, संपर्काची रेंज अद्याप अपुरी असताना निवडून येण्याचे गणित पाहून बालिशपणाचा कहर झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
पहिल्याच पत्रकार परिषदेत आपल्या राजकारणातील अज्ञानपणा दाखवून दिल्याने संबंधित इच्छुक उमेदवार बद्दल हास्यास्पद भावना लोक बोलून दाखवू लागले आहेत. केवळ पैशाच्या जीवावर जर निवडणुका होत असल्या तर आज प्रत्येक मोठ मोठे व्यवसायिक खासदार, आमदार झाले असते. हे समजण्याइतपतही जर उमेदवार हुशार नसेल तर तो आमदार कसा होणार… आणि अशा उमेदवारास कोण निवडून देणार…? असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.