सहा ठिकाणी नाकाबंदी, तडीपारीचे 13 प्रस्ताव, 749 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई ; लोकसभा निवडणुकांसाठी माळशिरस तालुक्याची पोलिस यंत्रणा सज्ज- उपविभागीय अधिकारी नारायण शिरगांवकर यांची माहिती
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्याच्या सिमेवर सहा ठिकाणी नाकाबंदी करण्याबरोबरच तडीपारीचे प्रांतअधिकारी यांच्याकडे 10 तर पोलिस अधिक्षकांकडे 3 असे एकुण 13 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत तसेच 749 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी महर्षि डिजीटल बरोबर बोलताना दिली.
नारायण शिरगांवकर म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नुकतीच सोलापूर, सातारा व पुणे ग्रामीण पोलिसांची नुकतीच जिल्ह्याच्या सिमेवरील बंदोबस्ताबाबत बैठक पार पडली असून या बैठकीत फरार आरोपी, तडीपार केलेले आरोपी, अवैध दारू, गुटखा, जुगार यामधील आरोपींच्या नावांची देवाण घेवाण करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तालुक्यातील परवानाधारक शस्त्र जमा करण्यास सुरूवात करण्यात आली असून एकुण 874 परवानाधारक शस्त्रांपैकी 320 शस्त्र जमा करण्यात आली आहेत. उर्वरीत नागरीकांनीही आपणाकडील शस्त्रे जमा करण्याचे आवाहन यावेळी शिरगांवकर यांनी केले आहे.
तसेच मागील 5 वर्षांतील निवडणुक काळात दाखल झालेल्या 32 गुन्ह्यातील 198 आरोपींवर एलसीबी कडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्यावर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अशा तब्बल 551 गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच 2, 3 आणि 4 तारखेला अकलूज, वेळापूर, माळशिरस, नातेपुते या ठिकाणी सीआयएसएफ व पोलिस यांचे पथसंचलन होणार आहे.