रणजीतसिंह निंबाळकर यांच्या खोट्या जाळ्यात भाजपा फसली ; माढा मतदारसंघासाठी मोहिते पाटील परिवाराने कंबर कसली
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : चार वर्ष मतदार संघापासून दूर राहिल्यानंतर शेवटच्या वर्षभरात काटावर निवडून आलेल्या (त्यातही तीन भाजपा विरहित) आमदारांच्या जीवावर बेगडी शक्ती प्रदर्शन करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा उमेदवारी पदरात पाडून घेतली असल्याने भाजपा निंबाळकर यांच्या खोट्या जाळ्यात फसली असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली असून दुसरीकडे ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मागच्या वेळी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता त्या मोहिते पाटील परिवाराने आता इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.
परंपरेप्रमाणे माढा लोकसभेसाठी उमेदवारीचा तिढा यंदाही डोकेदुखी ठरत असून भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवाराविरुद्ध पक्षातूनच होत असलेला विरोध व महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी होत असलेला उशीर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. असे असले तरी नुकतीच शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये अधिकचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील वारंवार मोहिते पाटील परिवार शरद पवारांबरोबर जातील असे संकेत देत असल्यामुळे मतदारसंघातील समर्थकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण मतदारसंघाचा दौरा आखला असून त्याची सुरुवात त्यांनी करमाळा व सांगोला तालुक्यातून केली आहे.
त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी शितलदेवी मोहिते पाटील यांनीही पुढाकार घेतला असून त्यांचेही मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. शिवाय अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनीही दौरा सुरू केला असून माढा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थकांसह विविध पक्षातील नेते मंडळींची ते भेट घेऊन चाचपणी करताना दिसत आहेत.
एकंदरीतच कार्यकर्त्यांचा आग्रह व मतदार संघातून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करतील अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होताना दिसत आहे.