Latest News

अकलूज नगरपरिषदेतील अधिकाऱ्याला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आई बहिणी वरून शिवीगाळ; परिसरात खळबळ, निषेधाची लाट

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : अकलूज नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याला भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आई-बहिणींवरून अक्षम्य शिवीगाळ केल्याचा प्रकार घडल्याने अकलूज परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार भाजपाच्या माजी आमदारांसमोरच घडला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी प्रचंड दहशतीखाली असून, ज्यांना शिवीगाळ झाली त्यांचे रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करावे लागले असल्याचेही बोलले जात आहे.

घटना घडत असताना नगरपरिषदेतील इतर शासकीय अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते, मात्र सर्वजण हतबल अवस्थेत शांत उभे राहिल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शिवीगाळ करणाऱ्यांची पार्श्वभूमी अवैध धंद्याशी संबंधित असल्याची चर्चा जोरात रंगत असून, त्यामुळे या घटनेला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले आहे.

अगोदरच तालुक्यातील पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय खात्यांचे अधिकारी दबावाखाली काम करत असल्याच्या चर्चा होत असतानाच अकलूज नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याच्या बाबतीत झालेल्या या प्रकारामुळे अकलूजच्या संस्कृतीवर डाग लागल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

यापूर्वीही नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यास भाजपा पदाधिकाऱ्याकडूनच मारहाण झाली होती. त्याबाबत गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. भाजपा कार्यकर्त्याकडून वारंवार घडणाऱ्या या निषेधार्ह घटनेमुळे अकलूज परिसरात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, “सत्तेच्या बळावर दहशत माजवण्याचा हा प्रयत्न की काय?” असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. घटनेनंतर अकलूज शहरात हा विषय चव्हाट्यावर आला असून सर्वत्र चर्चेचा ठरला असून, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!