एका प्रकरणाला १ लाख? एजेंट व कर्मचाऱ्यांची मिलीभगत ; साहेब आमचे पैसे मिळू द्या सगळ्यांची पोल खोलतो – पालखी मार्गाच्या भूसंपादनात अडकलेल्यांचे गाऱ्हाणे

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणार्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे भूसंपादनाचे निवाडे अंतिम टप्प्यात असतानाच नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. भूसंपादन कर्मचारी व एजेंट यांच्याकडून एका प्रकरणाला एक लाख रुपये दर दिला तरच निवाडे करणे व पेमेंट सोडण्याची प्रक्रिया केली जात असल्याची खात्रीशीर माहिती महर्षि डिजीटल न्यूजला मिळाली आहे.
या सर्व प्रकरणाच्या खोलात शिरण्याचा आम्ही प्रयत्न केल्यानंतर “साहेब आमचे पैसे मिळू द्या सगळ्यांची पोल खोलतो” अशा प्रतिक्रिया भूसंपादनाचे पैसे अडकलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात भूसंपादनाच्या घोटाळ्यात अडकलेल्या मास्टर माईंड ची व एजेंट ची नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माळशिरस तालुक्यातुन जाणार्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम जवळपास ९० टक्के तर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असतानासुध्दा अद्यापही अनेकांची भूसंपादनाची प्रकरणे प्रलंबित आहेत.
तत्कालीन भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी शमा पवार यांच्या बदलीनंतर बराच काळ नियमीत अधिकारी न मिळाल्याने प्रलंबित प्रकरणांचा निकाल लागू शकला नाही. त्यानंतर आलेले प्रांताधिकारी अधिक काळ न राहिल्यामुळे गेल्या काही महिन्यापूर्वी नियमीत कारभाराचा पदभार स्विकारलेल्या प्रांतअधिकारी विजया पांगारकर यांच्यापुढे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
त्यातच अशा प्रकरणांची चर्चा होऊ लागल्यामुळे नागरिकांना योग्य न्याय देणे व दोषी असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होते का नाही हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



