अकलूज नगरपरिषदेच्या द्वितीय वर्धापनदिना निमित्त 200 झाडांचे वृक्षारोपण ; 160 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज :
अकलूज नगरपरिषद स्थापनेला 3 ऑगस्ट रोजी दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने अकलूज नगरपरिषद व्दितीय वर्धापन दिन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त नगरपरिषद कार्यालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली. महादेव नगर परिसरात स.म.शं.मो.पा.लाकूड व्यापारी संघ सदस्य यांच्या उपस्थितीत सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरात २०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर अकलूज नगरपरिषद व स.म. शं.मो.पा.ब्लड बँक यांच्या वतीने सर्व कर्मचारी यांच्यासाठी रक्तदान शिबीर नगरपरिषद सभागृह येथे घेण्यात आले. यावेळी 37 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग घेतला.
तसेच आरोग्य विभाग महिला कर्मचारी व सर्व कर्मचारी यांच्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे व डॉ.चिराग व्होरा यांच्या हॉस्पिटल मार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. येथे घेण्यात आलेल्या कॅम्प मध्ये समाजात आरोग्य विषयी उपचार आणि प्रबोधन करण्यात आले. एकूण 160 कर्मचाऱ्यांना तपासण्यात आले. गरजेनुसार त्यांचे हिमोग्लोबिन, रक्तातील साखर ज्यास गरज आहे त्याचा ECG, सोनोग्राफी तसेच सिटी स्कॅन मोफत करण्यात आले.
अकलूज व माळेवाडी परिसरातील जि. प. विद्यार्थ्यांसाठी दोन गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षिस स्वरूपात देण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 57 विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली.
सदर आरोग्य तपासणी शिबीर दरम्यान डॉ.व्होरा यांनी अकलूज नगरपरिषदेचे कर्मचारी विशेषता आरोग्य कर्मचारी यांना विविध प्रकारचे आजार वारंवार होत असतात,परंतु आर्थिक परिस्थिती अभावी त्यांच्यावर उपचार करायला मर्यादा येतात. तरी सदरील कर्मचाऱ्यांनी मेडीक्लेम पॉलिसी उतरविल्यास कमी खर्चामध्ये त्यांचे भविष्यातील आजारपणाच्या उपचाराची व्यवस्था / सुरक्षितता येईल असे नमूद केले. यावर मुख्याधिकारी यांनी संपूर्ण नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे एक मॉडेल बनवून दिल्यास नगर परिषद मार्फत त्याचा भार उचलण्या बाबत पॉलिसीचा विचार केला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिले.



