आकड्यांचा खेळ करणाऱ्यांना महत्व देत नाही ; आमची बाजू निवडणुकीत दाखवून देऊ – नारायण पाटील
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : लोकसभा निवडणूक अजून लांब आहे तत्पूर्वीच आकड्यांचा खेळ करणाऱ्यांना आम्ही महत्व देत नाही आमची बाजू आम्ही निवडणुकीत दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी महर्षि डिजीटल न्यूज बरोबर बोलताना दिली.
काल अकलूज येथे नरेगा अंतर्गत केळी, द्राक्ष, डाळिंब लागवड संदर्भात शेतक-यांना येणाऱ्या अडचणी बाबत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शंकरनगर -अकलूज येथील सहकार महर्षी कारखान्याच्या उदय सभागृह येथे शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. सदर सभेस करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली. बैठक संपल्यानंतर ते महर्षि डिजीटल न्यूज बरोबर बोलत होते.
राजकीय घडामोडीवर आपली प्रतिक्रिया पाहिजे म्हंटल्यावर सुरुवातीला त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. परंतु विना कॅमेरा बोलताना त्यांनी सूचक विधान करत आपले मनसुबे स्पष्ट केले.
नारायण आबा म्हणाले, आम्ही ज्या व्यासपीठावर आहोत त्यावरून आम्ही कोठे आहोत व कोणाच्या बाजूने आहोत हे समजून घ्यावे ते काही सांगायची गरज नाही. 2 लाखांचे मताधिक्य देण्याच्या आ.बबनराव शिंदे यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले निवडणुका अजून लांब आहेत. आकड्यांचा खेळ करणाऱ्यांना महत्व देण्याची गरज नाही. निवडणुकीत आम्ही आमची ताकत दाखवून देऊ.



