संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 7364 झाडांचे वृक्षारोपण; भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा उपक्रम
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय च्या वतीने पालखी महामार्गाच्या दुतर्फा बाजूस वृक्षारोपण करण्यात आले.
मा. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय कडून काल दिवसभर वृक्षारोपण मोहीम आयोजित केली होती. या उपक्रमांतर्गत पंढरपूर येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाकडून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या बाजूला 7364 वृक्षांची लागवड केली. यामध्ये माळशिरस तालुक्यातील 2913 वृक्षांचा समावेश आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर मोहोळ ते वाखरी दरम्यान असलेल्या 44 कि.मी च्या अंतरावर वाखरी, खवणी, सारोळे, नारायण चिंचोली व पोखरापूर या ठिकाणी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वाखरीच्या सरपंच सविता कोरे, जि.प.सदस्य नाना गोसावी, सारोळेचे सरपंच शाहीर सलगर, पोखरापूरचे सरपंच चंद्रकांत लेंगरे उपस्थित होते. याबरोबरच वाखरी ते खुडूस या 33 कि.मी च्या मार्गावर भंडीशेगाव व तोंडले या ठिकाणी भंडीशेगावच्या सरपंच मनिषा यलमार व उपसरपंच विजय कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच खुडूस ते धर्मपुरी या 39 कि.मी.च्या महामार्गावर खुडूस, माळशिरस व कारूंडे तलाव या ठिकाणी खुडूसचे सरपंच विनायक ठवरे, व न्यु इंग्लिश स्कुलचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे पंढरपूर येथील प्रकल्प संचालक केशव घोडके, देवेंद्र प्रसाद, विजयकुमार, श्री किशोर, श्री.सुब्रमण्यम, श्री.निसार अहमद, श्री.शशीकांत, विनोद वाघमोडे, सोमा कदम, व मयुर काळे यांनी वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन केले होते.
संत तुकाराम महाराज पालखी महार्गावर पाटस ते बारामती दरम्यानच्या 41 कि.मी अंतरावर जराडवाडी येथे शोभा कांबळे भारत बनकर (सरपंच उंडेवाडी सुपे), उद्धव गवळी, श्रीमती आरती देसाई व श्रीमती अपूर्वा बेलसकर (प्राध्यापक फार्मसी कॉलेज बारामती) यांच्या हस्ते तर बारामती-इंदापूर मार्गावरील 42 कि.मी अंतरावर बेलवाडी, निमगांव केतकी, गोतोडी व शेळगांव या ठिकाणी शिक्षक सखाराम नलावडे, जयंत गुलाबराव जाधव (मुख्याध्यापक गोतोंडी) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याबरोबरच इंदापूर ते तोंडले दरम्यानच्या 46 कि.मी. अंतरावर वडापूरी व माळीनगर येथे मुख्याध्यापक शहाजी तपासे, हणुमंत खताळ, संभाजी पवार, विरू नायकुडे यांच्यासह शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प. का. ई. पंढरपूर चे व्यवस्थापक (तांत्रिक) इंद्रकुमार नारायणकर, दीपक देशमुख, सचिन राहिगुडे, अभिनव कुमार सिंग, महेश कामथे व आर.पी.सिंग, लाल बहादूर सिंग, अजित तरंगे, राजेंद्र घोरपडे, नरसिंह करडे, राहुल बोबडे, गणेश निंबाळकर, कुबेर रेडे, मनोज सुर्यवंशी यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले होते.
या कार्यक्रमाकरिता भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाप्रबंधक श्री. अंशुमली श्रीवास्तव व डॉ. सुरेश कुमार, संयुक्त सल्लागार पर्यावरण व वन, प्रादेशिक कार्यालय मुंबई ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.