वाहतूक कोंडीत अडकलेले अकलूज ; अकलूज पोलिसांची झोप आणि नागरिकांचा संताप!

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : अकलूज हे तालुक्याचे मुख्य ठिकाण… व्यापार, वाहतूक आणि उत्सव यांच्या गजबजाटाने नेहमीच जिवंत असलेलं शहर. पण यंदाच्या दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर, शहराची ही गजबज एका भयानक वाहतूक कोंडीत अडकली – आणि कारण ठरलं पोलिसांचं बेफिकीर दुर्लक्ष!
महर्षी चौक, सदुभाऊ चौक, गांधी चौक आणि प्रतापसिंह चौक या अकलूजमधील प्रमुख चौकांमध्ये दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज आणि नागरिकांचा प्रचंड त्रास असा अराजक दृश्य दिसत होता. हे सगळं घडत असताना, आश्चर्य म्हणजे पोलिस स्टेशन काही अंतरावर असतानाही एकही वाहतूक पोलिस त्या ठिकाणी हजर नव्हता!
ही परिस्थिती काही क्षणांची नव्हे, तर अनेक तास सुरू होती. पोलिसांची भूमिका नि:शब्द प्रेक्षक अशीच राहिली. जनतेच्या त्रासाकडे दुर्लक्ष, व्यापार्यांचा ओरडा, आणि पर्यटकांची गैरसोय – या सर्वांवर पोलिस प्रशासन गप्प राहिलं, हे अत्यंत लज्जास्पद आहे.
दिवाळीच्या दिवसांत बाजारपेठेत स्वाभाविकच गर्दी वाढते. अशा वेळी प्रशासनानं विशेष वाहतूक नियोजन, अधिक मनुष्यबळ, आणि नियंत्रण व्यवस्था कार्यरत ठेवायला हवी होती. पण वास्तव अगदी उलट – रस्त्यावर नागरिक त्रस्त आणि पोलिस गायब! ही बेपर्वाई केवळ गैरजबाबदारपणाचं नव्हे, तर जनतेच्या सहनशक्तीची चेष्टा मानली जात आहे.
अकलूजसारख्या प्रगत शहरात अशी कोंडी होणं आणि ती सोडवायला प्रशासन हजर नसणं म्हणजे नियोजनशून्यतेचं द्योतक म्हणावं लागेल. सणासुदीच्या दिवसांत नागरिक घराबाहेर पडतात, मुलं-मोठे खरेदीसाठी गर्दी करतात, अशा वेळी सुरक्षितता आणि सोयीसाठी सज्ज असणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे परंतु ते बजावताना मात्र पोलिस दिसले नाहीत!
या वाहतूक कोंडीत अडकलेले “आम्ही दिवाळीचा आनंद साजरा करतोय, की पोलिसांच्या दुर्लक्षाचा त्रास भोगतोय?” असा थेट सवाल विचारताना दिसत होते.
पोलिस प्रशासनानं याकडे केवळ तपास करू म्हणून न बघता, ताबडतोब नियोजन आणि जबाबदारी निश्चित करणं अत्यावश्यक आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेची नव्याने आखणी हाच एकमेव उपाय आहे.



