विज चोरी करणार्यांवर फौजदारी तर त्यामध्ये सामील असणार्या कर्मचार्यांचे होणार निलंबन-कार्यकारी अभियंता आण्णासाहेब काळे यांची माहिती
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : ‘कोण म्हणतं विज चोरी थांबवणे शक्य नाही?… जरूर शक्य आहे… आणि मी ते शक्य करून दाखवणार…’ असे म्हणत विज चोरी करणार्यांवर फौजदारी तर विजचोरीमध्ये सामील असलेल्या अथवा त्यांना पाठीशी घालणार्या अधिकारी कर्मचार्यांना निलंबीत करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आण्णासाहेब काळे यांनी महर्षि डिजीटल न्यूज शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माळशिरस तालुक्यातील अनागोंधी कारभारावर लक्ष वेधण्यासाठी ‘महर्षिने’ प्रसिध्द केलेल्या वृत्तासंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी उप कार्यकारी अभियंता दत्तात्रय ओमासे व अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदिप कोकरे उपस्थित होते.
मुळचे माढा तालुक्यातील उपळाईचे असलेले कार्यकारी अभियंता आण्णासाहेब काळे हे काही महिन्यापूर्वीच अकलूज येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अकलूज येथील कार्यालयात हजर झाले आहेत. विज चोरी रोखणे हे खूप मोठे आव्हान असले तरी ते अशक्य मात्र नक्कीच नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले. यापूर्वी मुंबई येथील मुंब्रा, भिवंडी सारख्या भागात आम्ही कडक कारवाई करत 2000 मोटारी जप्त केल्या होत्या त्यामुळे माझ्या अधिकारात असलेल्या नियमांचा व कायद्याचा वापर करून माळशिरस तालुक्यातील विज चोरीला आळा घालण्याची मोहिम हाती घेणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करत आकडे टाकून, मिटर मध्ये छेडछाड करून विज चोरी बंद करण्याचे आवाहन केले शिवाय असे करताना आढळल्यास प्रामाणिक व सुजाण नागरिकांनी माझ्याशी अथवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. विज चोरी रोखण्यासाठी कार्यालयांतर्गत येणार्या सर्व विभागाची बैठक घेवून सर्व अधिकार्यांना विज चोरांवर कारवाईच्या सूचना देणार असल्याचे कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात साप्ताहिक महर्षि मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणच्या यशवंतनगर कार्यालयाअंतर्गत चालणार्या विज चोरी व अधिकार्यांच्या मनमानी कारभाराबाबत प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत संबंधित अधिकार्याची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना बडतर्फ करण्याबाबतच्या हलचाली चालू आहेत. याबरोबरच काल महर्षि डिजीटल न्यूज या वेबपोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘डिपी जळाल्याने माळेवाडी येथील नागरीक पाच दिवसांपासून अंधारात ; त्रस्त नागरीक महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलना करण्याच्या तयारीत‘ या बातमीची तात्काळ दखल माळेवाडी(संजयनगर) परिसरातील डिपी सुरू करण्यात आला असल्याचेही कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.



