45.50 लाख रुपये व 19 तोळे सोने लाटले, एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
वेळापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून एका वर्षात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन करून तब्बल 45 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम तसेच 19 तोळे सोने, अंदाजे किंमत 15 लाख रुपये, असा एकूण 60 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केल्याची तक्रार वेळापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी फिर्यादी हर्षवर्धन शिवाजी जगदाळे (वय 31, रा. शिवाजी चौक, उघडेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार जानेवारी 2024 पासून आजपर्यंतच्या कालावधीत ‘बुल कॅपिटल’ या शेअर मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले.
एका वर्षात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देतो, असे सांगून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना विविध प्रकारे पैसे गुंतविण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या माध्यमातून फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून एकूण 45 लाख 50 हजार रुपये आणि 19 तोळे सोने घेण्यात आले. मात्र, त्यानंतर संबंधितांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी अमिर जाफर शेख (रा. इंदापूर, जि. पुणे), नासिर उर्फ सलमान नदीम चौधरी, इमरान नदीम चौधरी, नदीम सत्तार चौधरी (तिघे रा. जुना मुंढवा रोड, प्लॉट नं. डी-2001, दुसरा मजला, चंदननगर, पुणे), फिरोज उर्फ फारुख इब्राहिम बागवान, अरनाज फिरोज उर्फ फारुख बागवान आणि इमान उर्फ गब्बर इब्राहिम बागवान (तिघे रा. कराड नाका, मशीद मागे, पंढरपूर-अकलूज रोड, पंढरपूर, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून वेळापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 3(5), 316(2), 318(2), 318(4), 351(2), 352 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम, 1999 मधील कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि आशिष काबळे करीत आहेत.
या प्रकरणातील आरोपींनी खरोखरच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम व सोने घेतले का, तसेच या व्यवहारामागे आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.



