Latest News

माळशिरस विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; नावे तपासून दावे-हरकती नोंदवण्याचे आवाहन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत २५४, माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत स्वतःचे तसेच कुटुंबीयांची नावे तपासून आवश्यक असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन माळशिरस विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे.

सदर प्रारूप मतदार यादी नागरिकांच्या माहितीसाठी व तपासणीसाठी सर्व संबंधित मतदान केंद्रे, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी यादीतील आपले नाव, पत्ता, वय, लिंग, मतदान केंद्र आणि मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा नाव समाविष्ट नसल्यास विहित नमुन्यातील अर्ज भरून दुरुस्ती अथवा नाव नोंदणी करता येणार आहे.

या मोहिमेत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार असून, त्यावर २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय दिले जातील. यासाठी नागरिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात. ज्या नागरिकांचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण होत आहे, अशा नवमतदारांना नाव नोंदणीसाठी नमुना क्र. ६ भरावा लागेल. तसेच मयत अथवा स्थलांतरित व्यक्तींचे नाव वगळण्यासाठी किंवा नावावर आक्षेप घेण्यासाठी नमुना क्र. ७ आणि नाव, पत्ता, वय, नातेसंबंध, जन्मतारीख यातील दुरुस्ती, दिव्यांगत्वाची नोंद अथवा नवीन ई-इपिक (E-EPIC) ओळखपत्रासाठी नमुना क्र. ८ चा वापर करावा लागणार आहे.

याशिवाय नागरिकांना ‘व्होटर सर्व्हिसेस पोर्टल’ (voters.eci.gov.in) आणि ‘व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप’ द्वारेही ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व दावे-हरकती निकाली काढल्यानंतर येत्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने या पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button