Latest News

पंढरपूर-फलटण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण, DPR तयार ; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रयत्न यशस्वी होण्याच्या मार्गावर

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : पंढरपूर-फलटण आणि देहू या राष्ट्रीय रेल्वे मार्गांदरम्यान रेल्वे जोडणी निर्माण करण्याबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी २७ मार्च २०२६ रोजी लोकसभेतील शून्य प्रहरादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी लेखी उत्तर दिले असून, पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, DPR तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासनासह संबंधित विविध भागधारकांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच अन्य संबंधित यंत्रणांकडून प्रकल्पाचे परीक्षण आणि आवश्यक मंजुरी घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया ही सतत सुरू असणारी आणि गतिमान असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. संबंधित यंत्रणांकडून होणारे परीक्षण, तसेच आवश्यक मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेवर प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीची कालमर्यादा अवलंबून राहणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गामुळे सोलापूर, माढा, पंढरपूर, माळशिरस आणि फलटण परिसरातील दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे पंढरपूरसह परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच शेतीमालाची वाहतूक, उद्योगधंदे आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही बळ मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी हा प्रश्न लोकसभेत सातत्याने उपस्थित करण्यासोबतच रेल्वे मंत्रालयाकडे लेखी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन DPR तयार झाल्याचा टप्पा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

आता महाराष्ट्र शासनासह संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत, परीक्षण आणि मंजुरीची प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते, याकडे पंढरपूर, माळशिरस, माढा, सोलापूर आणि फलटण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button