मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापन दिन अकलूज-माळेवाडीत उत्साहात साजरा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापन दिन अकलूज-माळेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून संघटनेने उभारलेल्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी मराठा सेवा संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी जिजाऊ वंदना घेतली. यावेळी राजमाता जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य व स्वाभिमान यांचा आदर्श समाजजीवनात रुजविण्याचे आवाहन करण्यात आले.
मराठा सेवा संघाची स्थापना करून समाजातील विविध प्रश्नांना वैचारिक दिशा देण्याचे आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य करणारे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कार्याचाही यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजातील युवक, महिला आणि विविध घटकांना संघटित करून सामाजिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे राज्य संघटक उत्तमराव माने, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता दळवी, उपअभियंता अमर आरगडे, प्राध्यापक डॉ. विश्वनाथ आव्हाड, जयपाल देशमुख, संजय जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक मिलिंद कोथमीरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. विठ्ठलराव साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ कोडक, राजेंद्र मिसाळ, हेमलता मुळीक, अक्काताई माने, मनोरमा लावंड, सुवर्णाताई घोरपडे यांच्यासह मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी मराठा सेवा संघाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



