Latest News

नगरसेविका मृदुला सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : अकलूज नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका कु. मृदुला महेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील बहुउद्देशीय सभागृह, जुना बाजारतळ, अकलूज येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.

अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे आणि गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी-हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेवक व नगरसेविकांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरामध्ये नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांमध्ये लेन्स बसविणे आणि विविध नेत्रविकारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांच्या चष्म्याचा नंबर तपासून आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्याची सुविधाही यावेळी देण्यात आली.

शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या गरजू रुग्णांवर महंमदवाडी येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य वैद्यकीय सभापती तथा नगरसेवक क्रांतीसिंह किशोरसिंह माने-पाटील आणि नगरसेविका कु. मृदुला महेश सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. आपल्या परिसरातच दर्जेदार नेत्र तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नगरपरिषद, आयोजक तसेच एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले.

या कार्यक्रमास अकलूज नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, नगरसेविका मंदाकिनी पाडोळे, उज्वलाताई विटकर, कु. मृदुला महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांच्यासह प्रभाग क्रमांक ७ मधील कार्यकर्ते तसेच नेत्र तपासणीसाठी आलेले नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!