Latest News

राजकारणाच्या पलीकडचा जिव्हाळा ; बबनदादांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोहिते-पाटील पिता-पुत्र निमगावात

महर्षि डिजीटल न्यूज  | सागर खरात 

अकलूज : महाराष्ट्राच्या राजकारणात मतभेद आणि विचारसरणीच्या लढाया रोजच पाहायला मिळतात, मात्र वैयक्तिक नाती आणि माणुसकी राजकीय सीमांच्या पलीकडे जाऊन कशी जपायची, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा अनुभवले.

माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नुकतीच अमेरिका येथे अत्यंत गुंतागुंतीची आणि यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. एका मोठ्या वैद्यकीय आव्हानावर मात करून ते काही दिवसांपूर्वीच आपल्या मूळ गावी, निमगाव येथे परतले. योगायोगाने याच काळात त्यांचा अमृत महोत्सवी (७५ वा) वाढदिवसही पार पडला. या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी थेट निमगाव गाठून बबनदादांची भेट घेतली.

विजयसिंह मोहिते-पाटील आणि बबनदादा शिंदे यांचे सहकार्य आणि मैत्रीचा इतिहास अनेक दशकांचा आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रापासून ते राज्य पातळीवरील सत्तेच्या समीकरणांपर्यंत या दोन्ही नेत्यांनी अनेक चढ-उतार एकत्र पाहिले. गेल्या काही वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. जाहीर सभांमधून राजकीय मतभेदही समोर आले; मात्र त्या मतभेदांची सावली त्यांनी कधीही वैयक्तिक स्नेहबंधांवर पडू दिली नाही. निमगावच्या या भेटीने याच जुन्या आणि घट्ट नात्याची प्रचिती दिली.

निमगाव येथील निवासस्थानी झालेल्या या भेटीत राजकीय चर्चांना पूर्णपणे बाजूला ठेवून केवळ आपुलकी, जुन्या आठवणी आणि आस्थेचे वातावरण पाहायला मिळाले. मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी बबनदादांच्या शस्त्रक्रियेनंतरच्या रिकव्हरीबद्दल, सध्याच्या दिनचर्येबद्दल आणि तब्येतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतानाच दादांनी घेतलेली ही आरोग्याची नवी उभारी कौतुकास्पद असल्याचे सांगत, विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ते लवकरात लवकर पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पूर्ववत सक्रिय व्हावेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

सत्ता, पदे आणि राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन जपलेली ही मातीतील मैत्री सध्या सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. राजकीय वैर तात्पुरते असते, पण माणसांमधील जिव्हाळा कायमस्वरूपी टिकतो, हाच संदेश या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!