Latest News

पंढरपुरात ३ हॉटेल्स बंद ; आता माळशिरसची पाळी?, पंढरपुरात कारवाईनंतर खळबळ; पालखी मार्गावरील हॉटेल्सही रडारवर?

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर शहरात धडक तपासणी मोहीम राबविली आहे. १४ जुलै २०२६ पर्यंत झालेल्या या कारवाईत २१७ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १७२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच निकृष्ट स्वच्छता व नियमांचे उल्लंघन आढळल्याने ३ आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते आदी २१७ आस्थापनांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे १७२ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

३ आस्थापनांवर तात्काळ कारवाई

स्वच्छतेचा अभाव व निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आढळल्याने खालील आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मे. मंगलमुर्ती मिसळ व भेळ, तीन रस्ता, शेगाव दुमाला, ता. पंढरपूर

मे. हॉटेल स्वरा अँड चायनिज सेंटर, शेगाव दुमाला, ता. पंढरपूर

मे. हॉटेल श्री विष्णू सहस्त्रनाम, शेगाव दुमाला, ता. पंढरपूर

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ अन्नपदार्थांमुळे कोणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे खाद्यतेल, कृत्रिम रंग तसेच इतर घटकांची गुणवत्ता यांची काटेकोर तपासणी करण्यात आली.

माळशिरस तालुक्यातील आस्थापनांनीही सावध राहावे

दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून मार्गक्रमण करणार आहेत. या काळात हजारो वारकरी तालुक्यातील हॉटेल्स, खानावळी, नाश्ता केंद्रे, चहा स्टॉल, फराळ केंद्रे आणि इतर खाद्य आस्थापनांमध्ये भोजन करतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून माळशिरस तालुक्यातील खाद्य आस्थापनांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ मधील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.

सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले की, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा-२००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व व्यावसायिकांनी स्वच्छता, गुणवत्ता व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आषाढी वारी २०२६ साठी अन्न व औषध प्रशासनाची २० विशेष पथके कार्यरत असून वारी कालावधीत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!