Latest News

गोठ्यातून लपवला गांजाचा साठा; 20 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांच्या छाप्यात मोठा पर्दाफाश

महर्षि डिजीटल न्यूज 

मोहोळ : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे शेतातील जनावरांच्या गोठ्यात लपवून ठेवलेला तब्बल 40 किलो 385 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 20 लाख 19 हजार 250 रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला असून भैरवनाथ भोसले (रा. अंकोली, ता. मोहोळ) याला अटक करण्यात आली आहे.

पंढरपूर आषाढी वारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अंमली पदार्थ व अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या पथकाला विशेष कारवाईचे आदेश दिले.

दरम्यान, 16 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांचे पथक मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार विजय भरले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार भैरवनाथ भोसले याने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्याशी समन्वय साधून संयुक्त छापा टाकला. गोठ्याची झडती घेतली असता तेथे दोन प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळला. पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाची पाने, बिया व बोंडे असलेला 40 किलो 385 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 20 लाख 19 हजार 250 रुपये इतकी असून तो ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी भैरवनाथ भोसले याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 699/2026 अन्वये अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), 1985 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस ठाणे करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व मोहोळ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!