Latest News

अकलूज शहर बंद ठेवू नये; शांतता व समन्वय समितीचा सर्वानुमते निर्णय

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : चौंडेश्वरवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर अकलूज येथील शांतता व समन्वय समितीच्या सोमवारी (दि. १३ जुलै २०२६) झालेल्या बैठकीत शहर बंद ठेवू नये, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. शहरातील नागरिक, व्यापारी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समितीने केले आहे.

बैठकीच्या प्रारंभी चौंडेश्वरवाडी येथील घटनेत मृत्यू झालेल्या स्वर्गीय उषाताई साठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत दोषींवर कोणताही पक्षपात न करता कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी अकलूज शहर बंद न ठेवण्याचा निर्णय घेताना व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत राहावे, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळावे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे समितीने स्पष्ट केले.

शहर बंदबाबत विविध माध्यमांतून आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असले, तरी नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवून व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही समितीने केले आहे.

पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, हीच सर्वांची भावना असून त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समितीने नमूद केले. तसेच अकलूजची शांतता, सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव कायम राखत शहरातील सलोखा अधिक दृढ करण्याचे आवाहन शांतता व समन्वय समिती, अकलूजच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!