आमदार उत्तमराव जानकर यांच्या पाठपुराव्याला यश; शिवपुरी मळा व श्रीपूर मळा परिसरात एमआयडीसी स्थापनेच्या हालचालींना वेग

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) शिवपुरी मळा व श्रीपूर मळा परिसरातील शेतजमिनीवर औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत पुढील कार्यवाही सुरू केली असल्याचे पत्र समोर आले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सोलापूर कार्यालयाकडून तहसीलदार माळशिरस यांना याबाबत अधिकृत पत्र पाठविण्यात आले असून, प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी संबंधित जमिनींची पाहणी, सर्वेक्षण आणि माहिती संकलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्रात आमदार उत्तमराव जानकर यांनी उद्योगमंत्र्यांकडे केलेल्या मागणीचा तसेच माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या निवेदनाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
आमदार जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, खाजगी उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा, या उद्देशाने एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार श्रीपूर मळा येथील महाळुंग, बोरगाव व जांबूड तसेच शिवपुरी मळा येथील गुरसाळे व दहिगाव परिसरातील जमिनींचा विचार सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याठिकाणी भविष्यात आयटी पार्क, अॅग्रीकल्चर पार्क, इंडस्ट्रियल हब आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्याची संधी निर्माण होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन रोजगारनिर्मिती होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाला संबंधित गावनिहाय जमिनींची माहिती, बागायत-जिरायत तपशील, न्यायप्रविष्ट बाबी तसेच अतिक्रमणासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यालयाकडे पाठविला जाणार आहे.
माळशिरस तालुक्यात औद्योगिक विकासाची मोठी संधी निर्माण होत असल्याने नागरिक आणि युवकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.



