Latest News

नितीन गडकरींचा उद्या नातेपुते, वेळापूर मार्गे सोलापूर जिल्हा दौरा ; पालखी महामार्गाची करणार पाहणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार, दि. १४ मे रोजी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पाहणी, आढावा बैठक आणि भूमिपूजन सोहळ्यांना उपस्थित राहणार आहेत. विशेषतः माळशिरस तालुक्यातील विकासकामांची पाहणी आणि ऐतिहासिक स्थळांना ते भेट देणार असल्याची माहिती आहे.

गडकरींच्या दौऱ्याची सुरुवात गुरुवारी सकाळी पुण्यातील जे.डब्ल्यू. मॅरियट (JW Marriott) हॉटेलमधून होईल. हडपसरमार्गे ते जेऊरीकडे प्रस्थान करतील, जिथे प्रसिद्ध दिवे घाट परिसराच्या रस्ते कामाची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील फलटण येथे नीरा कालव्यावर बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘UHPFRC’ पुलाला भेट देऊन ते माध्यमांशी संवाद साधतील.

फलटणमधील कार्यक्रम आटोपून मंत्री गडकरींचा ताफा माळशिरस तालुक्यात दाखल होईल. नातेपुते, वेळापूर आणि वाखरी असा हा प्रवास असणार आहे. यावेळी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विहीर आणि वाखरी येथील बाजीराव विहीर या दोन ऐतिहासिक स्थळांना ते भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेणार आहेत. या थांब्यांदरम्यान तालुक्यातील महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीवर त्यांची विशेष नजर असणार आहे.

दुपारी २ वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचून ते श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतील. दर्शनानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी भोजन आणि विश्रांतीचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने अक्कलकोटकडे रवाना होतील. अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि शिवपुरी या धार्मिक स्थळांना ते भेट देतील.

सायंकाळी अक्कलकोट बसस्थानक परिसरात सोलापूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भव्य भूमिपूजन सोहळा गडकरींच्या हस्ते संपन्न होईल. या कार्यक्रमानंतर ते सोलापूर शहरातील हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर येथे मुक्कामासाठी थांबणार आहेत.

या संपूर्ण दौऱ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ७० हून अधिक माध्यम प्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सुविधेसाठी दोन विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबत रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा पथकाचा मोठा ताफा तैनात असणार आहे.

या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील, विशेषतः माळशिरस तालुक्यातील रस्ते विकास आणि दळणवळणाच्या प्रश्नांना मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!