माळशिरस तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार – दादासाहेब लोखंडे; माळशिरस पंचायत समितीवर शिवसेना (शिंदे गट)चा झेंडा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
माळशिरस : माळशिरस पंचायत समितीवर शिवसेना (शिंदे गट)चा झेंडा फडकला असून तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना आता गती देण्यात येणार असल्याचा विश्वास शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्याचा विकास करण्याच्या उद्देशाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर तसेच डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी), राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष अशी चार पक्षांची युती करण्यात आली होती.
या युतीत जिल्हा परिषदेत एक तर पंचायत समितीत दोन उमेदवार बहुमताने निवडून आले. आमदार व खासदार असलेल्या घराण्यांकडेच सभापती व उपसभापती पदे न देता ही संधी कार्यकर्त्यांना मिळावी, या हेतूने आमदार उत्तमराव जानकर व खासदार धर्यशील मोहिते-पाटील यांनी निमगाव गणाचे उमेदवार दत्ता भैय्या मगर यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड केली, तर मनीषा मदने यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
गावांमधील पाणी प्रश्न, ओढ्यांचे खोलीकरण, पानंद रस्ते, घरकुल योजना, अंतर्गत रस्ते, अंगणवाडीचे प्रश्न, स्मशानभूमीची कामे तसेच शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
या निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून तालुका उपप्रमुख तानाजी भोळे-पाटील, व्ही.जी.एन.टी.चे तालुकाप्रमुख शहाजी आप्पा काळे, अकलूज शहरप्रमुख महेश पवार, दिगंबर साठे, गणेश खंडागळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन प्रचार केला. विकासकामांचे आश्वासन देत कार्यकर्त्यांनी केलेल्या जनसंपर्कामुळे युतीला यश मिळाले, असेही लोखंडे यांनी सांगितले.



