Latest News

नातेपुतेत थरारक खून: पत्नी-मेहुण्याने दगड-सुरीने संपवला पतीचा जीव; आरोपी जेरबंद

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

नातेपुते : माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे पत्नी व मेहुण्याने मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.

मौजे नातेपुते येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पर्वतेश्वर माळ, नातेपुते (ता. माळशिरस) येथील विजय डोंग्या भोसले (वय ३५) यांचा खून करण्यात आला. पत्नी कांती विजय भोसले व तिचा भाऊ यया बि-या काळे (रा. बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी विजय भोसले याला “बारामतीला राहायला चल” असे सांगून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर झालेल्या भांडणात यया बि-या काळे याने विजय भोसले यांच्या डोक्यात दगड मारला, तर कांती भोसले हिने सुरीने त्यांच्या कानावर वार केला. त्यानंतर दोघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून विजय भोसले यांना ठार मारले.

या प्रकरणी मचकूर येथील फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके तसेच पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानीय गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई करत महिला आरोपी कांती विजय भोसले हिला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान कांती भोसले हिने हा खून आपण आणि यया बि-या काळे यांनी मिळून केल्याची कबुली दिली. दरम्यान मुख्य आरोपी यया बि-या काळे हा फरार झाला होता.

नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीचा माग काढला. तो सातारा जिल्ह्यातील रहीमतपूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याचा पाठलाग करत रहीमतपूर येथून त्याला ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली मपोसई सोनल मोरे, सतीश पाटकुलकर, देविदास धोत्रे, रविंद्र गायकवाड, धनाजी शेळके, राकेश लोहार, सुरेश एकतपुरे, रणजित मदने, अस्लम शेख, सीमा सोनवणे, संतोष वारे, नवनाथ चव्हाण तसेच सायबर शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण मेटकरी यांच्या विशेष पथकाने पार पाडली.

हत्येच्या या घटनेमुळे नातेपुते परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!