सोनोग्राफीतील निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू? अकलूजच्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूजमध्ये एका नामांकित समजल्या जाणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरमधील कथित निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिलेची सोनोग्राफी अकलूजमधील एका नामांकित डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करण्यात आली होती. त्या वेळी करण्यात आलेल्या तपासणीत गर्भातील बालकाच्या हृदयात कोणताही दोष नसल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र, महिलेचा त्रास कमी न झाल्याने पालकांनी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा सोनोग्राफी केली असता, बालकाच्या हृदयात छिद्र (होल) असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, हा गंभीर दोष वेळेत निदर्शनास न आल्याने उपचाराला उशीर झाला आणि अखेर त्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित डायग्नोस्टिक सेंटरच्या कार्यपद्धतीवर आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अकलूजची ओळख ‘मेडिकल हब’ म्हणून असून, येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरांना याबाबत विचारणा केली असता “मला छिद्र दिसले नाही” असे बालिश उत्तर देण्यात आले. या उत्तरामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ही बाब अत्यंत गंभीरपणे घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करून अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालावा, अन्यथा भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



