घरांचे पत्रे उडाले, भिंती कोसळल्या… डोळ्यांत अश्रू असलेल्या कुटुंबांना शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा दिलासा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज परिसरात काल झालेल्या तुफानी वादळी वाऱ्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. काही घरांची पत्रे उडून गेली, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्याने नागरिकांवर संकट कोसळले. या आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या आणि डोळ्यांत अश्रू दाटलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांच्या भेटीस अकलूज नगरपरिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी धाव घेत दिलासा दिला.
शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूजमधील विकासनगर, शनि मंदिर परिसर, काझी गल्ली, महर्षी कॉलनी, व्यंकटनगर, कर्मवीर चौक आणि सयाजीराजे नगर या भागांना भेट देत वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. जवळपास ३० ते ३५ घरांची पडझड झाल्याचे, पत्रे उडून गेल्याचे तसेच झाडे घरांवर कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या. संकटाच्या या कठीण काळात नागरिकांना धीर देत शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देत शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळवून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे, नगरसेवक क्रांतिसिंह माने-पाटील, सचिन देशमुख, विशाल मोरे, मोहसीन शेख, अझहर शेख, विलास क्षीरसागर, प्रतिभा गायकवाड, मनीषा तिकोटे, लालासाहेब अडगळे, महेश सूर्यवंशी यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या वेदना जवळून जाणून घेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या पाहणी दौऱ्यातून देण्यात आला. नागरिकांच्या संकटाच्या काळात त्वरित मदत व दिलासा मिळवून देण्यासाठी अकलूज नगरपरिषद कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



