कारवाईच्या धसक्याने अकलूज परिसरातील गुटखा-मावा विक्रेत्यांचे शटर डाउन ; कारवाईच्या चर्चेने अनेक दुकाने दिवसभर बंद; व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात गुटखा, मावा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू झालेल्या धडक कारवायांमुळे अकलूज परिसरातील गुटखा-मावा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच भीतीमुळे अनेक गुटखा-मावा विक्रेत्यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवल्याचे दिसून आले.
अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या आहेत. अकलूजमधील मावा अड्ड्यावर झालेल्या कारवाईनंतर तर अनेक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच अकलूज शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसर, गांधी चौक, विजय चौक तसेच विविध उपनगरांतील अनेक गुटखा-मावा विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. काही ठिकाणी दुकानदारांनी शटर खाली ठेवून परिस्थितीचा अंदाज घेण्याचे धोरण स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात गुटखा, मावा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची विक्री अनेक ठिकाणी सुरू असल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. काही ठिकाणी उघडपणे तर काही ठिकाणी चोरूनछपून अशा पदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच ऐकायला मिळते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अलीकडील कारवायांचा धसका घेत अनेक गुटखा-मावा विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने बंद ठेवली असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, तालुक्यातील अनेक भागांमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि मावा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. काही विक्रेते उघडपणे तर काही विक्रेते मागील दरवाजाने अथवा ग्राहकांशी थेट संपर्क साधून चोरून विक्री करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कारवाई केवळ काही दुकानांपुरती मर्यादित न राहता अशा सर्वच ठिकाणांची कसून तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या कारवायांचे स्वागत होत असले तरी त्या केवळ काही दिवसांच्या मोहिमेपुरत्या मर्यादित न राहता सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे. अकलूजसह संपूर्ण माळशिरस तालुक्यातील गुटखा-मावा विक्रेते, पानमसाला विक्रेते आणि प्रतिबंधित पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या सर्वच आस्थापनांवर समान निकषांवर कारवाई झाली तरच या मोहिमेचा अपेक्षित परिणाम दिसून येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, FDAच्या संभाव्य कारवाईच्या चर्चेमुळे अकलूज परिसरातील गुटखा-मावा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत प्रशासनाचा मोर्चा नेमका कोणत्या भागाकडे वळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या अनेकांचे धाबे दणाणल्याची चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.



