Latest News

अकलुजमध्ये शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा अतिरेक; ध्वनीप्रदूषण प्रकरणी ११ मंडळांवर गुन्हे दाखल

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलुज : शिवजयंती उत्सवा दरम्यान ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकलुज पोलिसांनी ११ शिवजयंती उत्सव मंडळे व संबंधित डीजे/डॉल्बी धारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे, डॉल्बी व लेझर शोचा वापर करून सार्वजनिक शांतता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी शिवजयंतीपूर्वी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे सर्व शिवजयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन डीजे/डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे तसेच सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.

त्याअनुषंगाने अकलुज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनीही स्थानिक मंडळे, डीजे धारक व नागरिकांची बैठक घेऊन शांततेत मिरवणूक पार पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. सर्व मंडळांना भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १६८ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

मात्र, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी अकलुज शहरातील विविध मंडळांनी मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशाचेही उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३(२), २२५(५), ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चे कलम ३, ४, ८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ध्वनीप्रदूषणाची नोंद (डेसीबलमध्ये)

१) हिंदवी प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – १०८ डेसिबल

२) लहुजी साम्राज्य प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – ११५ डेसिबल

३) सह्याद्री प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – १०५ डेसिबल

४) छावा ग्रुप शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – १०५ डेसिबल

५) स्वराज्य प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, यशवंतनगर – ११२ डेसिबल

६) शिवदत्त प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – ११० डेसिबल

७) नवक्रांती प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – ११७ डेसिबल

८) रामरहीम प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – ११८ डेसिबल

९) संभाजीराजे प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – १२५ डेसिबल

१०) शिवमुद्रा प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – ११० डेसिबल

११) महाराज प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव मंडळ, अकलुज – १०७ डेसिबल

पोलिस प्रशासनाने नागरिकांनी कायद्याचे पालन करून पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे. पुढील काळातही ध्वनीप्रदूषणाबाबत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!