जयसिंह चौक ते कर्मवीर चौक हा रखडलेला रस्ता अखेर मार्गी ; अकलूज नगरपरिषदेच्या नगरोत्थान योजनेतून होणार काँक्रिटीकरण”
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा जयसिंह चौक – गांधी चौक ते कर्मवीर चौक हा दोन किलोमीटरचा रस्ता अखेर अडथळ्यांमधून बाहेर येत नगर परिषदेच्या अखत्यारीत वर्ग करण्यात आला आहे. गेली काही वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्यातील अखत्यारविषयक वादामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती व विकासाची कामे रखडली होती. परिणामी, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी थेट मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू केला. संबंधित विभागांशी सलग बैठका घेऊन, आवश्यक पत्रव्यवहार करून अखेर रस्ता नगर परिषदेकडे वर्ग करण्याचा लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.
नगर परिषदेकडे हा रस्ता वर्ग झाल्याने आता नगरोत्थान योजनेतून या रस्त्याचे संपूर्ण कॉंक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि दिव्यांची उभारणी या कामांमुळे या भागाचे सौंदर्य आणि सुविधा दोन्ही वाढणार आहेत.
या निर्णयाबाबत शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले, “अकलूज शहराच्या वाहतुकीचा हा मुख्य मार्ग आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या दर्जेदार विकासासाठी हा रस्ता नगर परिषदेकडे वर्ग होणे अत्यंत आवश्यक होते. आता कॉंक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून अकलूजकरांना एक सुंदर आणि टिकाऊ रस्ता लवकरच मिळेल.”
या निर्णयामुळे अकलूज शहराच्या नागरी विकासाला नवसंजीवनी मिळाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



