Latest News

बाजारतळ सोडून बसलेल्या शेतकऱ्यांकडून पावत्या फाडल्या नाहीत : अकलूज नगरपरिषदेचे स्पष्टीकरण ; आरोप बिनबुडाचे

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : अकलूज नगरपरिषद हद्दीतील नवीन बाजारतळ येथे आठवडा बाजार भरताना काही शेतकरी व व्यापारी पावसामुळे बाजारतळाची जागा सोडून इतरत्र खाजगी ठिकाणी विक्रीस बसल्याची बाब काही माध्यमांतून समोर आली होती. त्यातून नगरपरिषदेच्या कारभारावर शंका उपस्थित करत शेतकरी व व्यापार्‍यांना बाजारतळात पुरेशा सुविधा नसल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत नगरपरिषदेने आपली भूमिका मांडली आहे.

नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी व व्यापार्‍यांना बाजारतळ परिसरात विक्रीस बसण्यासाठी वारंवार सांगण्यात आले होते. तरीदेखील काहींनी खाजगी जागा गाठली. त्यामुळे त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारच्या पावत्या फाडलेल्या नाहीत. तरीसुद्धा या मुद्यावरून नगरपरिषदेवर आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वास्तविक हेच शेतकरी व्यापारी यापूर्वी अकलूज-माळशिरस कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यावर विक्रीस बसत होते. त्या ठिकाणी प्रचंड रहदारी असल्याने अपघाताचा धोका कायम होता. त्यामुळेच नगरपरिषदेने शेतकरी व व्यापाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजारतळ परिसरात विक्रीस बसण्याची सूचना वजा विनंती केली होती.

मात्र “बाजारतळ परिसरात धंदा होत नाही, शेतमाल विक्री होत नाही” अशा कारणांचा दाखला देत काहींनी खाजगी जागेत शेतमाल विक्री सुरू केली व आरोपांचे खापर नगरपरिषदेवर फोडले.

दरम्यान, आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची सोय व्हावी म्हणून नगरपरिषदेने तब्बल दोन कोटी ५० लाख रुपये खर्चून ८० बाय ७५ फूटाचे काँक्रीटचे दोन कट्टे उभारले आहेत. लवकरच १६ मीटर बाय २४ मीटरचा आणखी एक कट्टा उभारणीस येणार असून, या सोयीमुळे २५० ते ३०० विक्रेत्यांना एकाचवेळी बसण्याची सोय होत आहे. याशिवाय बाजारतळ परिसरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरणही करण्यात आले आहे. आणि जिथे चिखल होतो तिथे मुरूम टाकण्याचे कामही करण्यात येत आहे.

“अशा पायाभूत सुविधा असतानाही विक्रेते बाजारतळ सोडून बाहेर बसत असतील तर त्याला नगरपरिषद जबाबदार ठरू शकत नाही. बाजारतळ परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी नगरपरिषद सक्षम आहे आणि पुढील काळातही प्रयत्नशील राहणार आहे,” असे अकलूज नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!