गुन्ह्यांचा तपास करून तब्बल १८.३० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत ; सोने, चांदीचे दागिन्यासह रोख रकमेचा समावेश

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार, तपास कौशल्य आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अकलूज पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून तब्बल ₹१८,३०,८०० किंमतीचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मूळ मालक व फिर्यादींना परत केले.
या मोहिमेत २०१२ ते २०२५ दरम्यान दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांमधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात सोन्याच्या गंठणांपासून अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, पाटली, चांदीची पैंजणं, जोडवी, करंडा तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे. काही प्रमुख परत मिळालेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे आहे –
- गु.र.नं. 46/2012, कलम 379 – ₹8,000 रोख
- गु.र.नं. 86/2015, कलम 379 – ₹60,000 किंमतीचे 191.24 ग्रॅम चांदीचे दागिने
- गु.र.नं. 43/2015, कलम 380 – ₹3,300 रोख
- गु.र.नं. 181/2024, कलम 380 – ₹65,000 किंमतीची सोन्याची अंगठी व चांदीची पैंजण
- गु.र.नं. 545/2025, कलम 303(2) – ₹9,50,000 किंमतीचे सोन्याचे गंठण, बांगड्या, पाटली
- इतर गुन्ह्यांतील सोन्याच्या साखळ्या, डोरले, अंगठ्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम
ही कारवाई सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मुद्देमाल परत देण्याच्या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, तसेच अकलूज उपविभागातील इतर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत झाला असून, गुन्हे उघडकीस आणण्यासह चोरीचा मुद्देमाल परत करण्यामध्ये अकलूज पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.



