मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंपी समाजाच्या विविध मागणीचे डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी दिले निवेदन

महर्षि डिजीटल न्यूज
पंढरपूर : संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. त्यावेळी व्यासपीठावरून शिंपी समाज बांधवांच्या पंढरपूर येथे नामदेव महाराजांची स्मारक व नामदेव मंदिराचा जीर्णोद्धार तसेच शिंपी समाजाच्या उन्नती करिता विविध मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आले होते
त्याचबरोबर या निवेदनात म्हटले आहे की,सर्व समाजाला आनंद देणारी बाब आहे. नामदेव महाराजांनी ६००-६५० वर्षांपूर्वी केलेले कार्य, दिलेले विचार सर्वसमावेशक व प्रेरणादायी आहेत, मराठवाडा ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पंजाबमधील घुमान पर्यंत त्यांनी त्या कालखंडात केलेला प्रवास, लोकोत्तर कार्य हाच आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांनी अनेक कामांतून समाजाला दिशा देण्याचे काम केले. यामुळेच आजही आपला नामदेव शिंपी समाज सहिष्णू, लोकोपयोगी व सर्वसमावेशक विचारांचा आहे. आपल्या समाजात टोकाचा संघर्ष किंवा द्वेष निर्माण होईल असे वर्तन करणारे लोक नाहीत ही नामदेव महाराजांच्या विचारांची देणगी आहे असे माझे ठाम मत आहे.
आपला समाज लोकसंख्येने इतरांपेक्षा कमी आहे व तो सरळमार्गी जीवन जगणारा आहे हे जरी खरे असले तरी आपल्या लोकांना देखील अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते, काही ठिकाणी शासन स्तरावर काही प्रश्न निर्माण होतात तेव्हा पाठपुरावा करावा लागतो. यासाठी माझी यानिमित्ताने मा. मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे कि आपण आमच्या समाजाकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
सध्या अशी स्थिती आहे कि गोंधळ करणारे व समाजात तेढ निर्माण करणारे काही लोक आपापल्या समाजाचा व जातीचा आधार घेऊन संपूर्ण समाजात अस्थिरता पसरवत आहेत, मात्र असे असले तरी त्यांच्या समाजाची कामे काही अंशी तरी मार्गी लागत आहेत.
आमच्या समाजाची लोकसंख्या कमी असल्याने, आम्ही लोक सहिष्णुतापाळणारे असल्यामुळे आमच्या समाजाकडे मात्र राजकीय दृष्टीने पाहिले जात नाही व परिणामी आम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत नाही. तेव्हा यानिमित्ताने माझी आपणाकडे एकच मागणी आहे कि आमच्या समाजातील कोणत्याही योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्यापासून सुरू झालेली सामाजिक बांधिलकी जपत विकासासाठी काम करण्याची परंपरा अधिक जोमाने पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या नेतृत्वात आमचा समाज करत राहील व महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील याबद्दल मला खात्री आहे.आपण माझ्या मागणीचा गांभीर्याने विचार कराल अशी मला आशा आहे. असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.अशी माहिती डॉ श्रद्धा जवंजाळ यांनी दिली.



