‘मोहिते-पाटील’ नावाचं वादळ ! सत्तेत नसूनही ‘डंका’ कायम ; सत्ता नाही, निधी नाही… तरीही जनतेच्या मनावर अधिराज्य

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्तेच्या दिशेने नेत्यांचा ओढा असतो, हा आपल्या राजकीय इतिहासाचा भाग आहे. त्यामुळे आज अनेक नेते सत्ताधारी पक्षांकडे वळताना दिसत असले, तरी त्यात फारसे नवल वाटण्यासारखे काही नाही. मात्र यावेळी सुरू असलेले पक्षांतर आणि सत्तेच्या जवळ जाण्याची स्पर्धा काहीशी अतिरेकाची वाटू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर एक राजकीय घराणे मात्र वेगळेपणाने अधोरेखित होते आणि ते म्हणजे राज्यातील प्रभावशाली राजकीय घराण्यांपैकी एक असलेले मोहिते-पाटील घराणे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी उभारलेले सहकार, समाजकारण आणि राजकारणाचे भक्कम साम्राज्य ही या घराण्याची खरी ओळख आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या बंधूंनी या वारशाचा विस्तार करत राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवला. त्यामुळे मोहिते-पाटील घराणे हे केवळ माळशिरस तालुक्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील एक प्रभावी केंद्र बनले.
मात्र सर्व काही सुरळीत सुरू असताना २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर चित्र बदलू लागले. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील यांना झालेला पराभव हा या परिवारासाठी मोठा राजकीय धक्का होता. विरोधक आणि काही स्वकीयांच्या राजकीय डावपेचांमुळे हा पराभव झाल्याची चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणावर झाली. याच काळापासून “मोहिते-पाटील युग संपले” असा सूर विरोधकांकडून सातत्याने आळवला जाऊ लागला. परंतु पुढील घडामोडींनी हा दावा केवळ कल्पनाविलास असल्याचे सिद्ध केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली. एकीकडे नरेंद्र मोदी यांची देशभर उसळलेली लाट आणि दुसरीकडे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विस्तीर्ण असा माढा मतदारसंघ, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढवली.
शेतकरी आंदोलनांचा उद्रेक, भीषण दुष्काळ आणि कोणत्याही सत्तापदाचा आधार नसताना त्यांनी हा राजकीय किल्ला लढवला आणि राज्यातील भाजपाविरोधात निवडून आलेल्या मोजक्या चार खासदारांपैकी एक ठरले. ही विजयगाथा कोणत्याही सत्तेच्या बळावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर उभी होती.
यानंतरच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे २०१९ मध्ये मोहिते-पाटील परिवाराने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या सोलापूर जिल्ह्यात, विशेषतः माढा आणि माळशिरस परिसरात, भाजपचा बाहेरून आलेला उमेदवार आपल्या ताकदीवर निवडून आणण्याची किमया मोहिते-पाटील परिवाराने करून दाखवली.
त्याच्या बदल्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली खरी; परंतु राजकीय कुरघोड्या आणि अंतर्गत स्पर्धेचे राजकारण मात्र तेथेही कायम राहिले.
त्यानंतर २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निर्णायक वळण आले. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना बाजूला ठेवून मोहिते-पाटील परिवाराने पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील तुतारी हाती घेतली. त्याचे परिणामही तितकेच प्रभावी ठरले. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. एवढेच नव्हे तर माळशिरससह इतर चार विधानसभा मतदारसंघांमध्येही तुतारीचा निनाद घुमला.
त्यानंतर झालेल्या नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही मोहिते-पाटील परिवाराने आपला दबदबा कायम राखत माळशिरस तालुक्यात एकतर्फी विजय मिळवला.
विशेष म्हणजे गेली १५ ते २० वर्षे सातत्याने सत्तेपासून दूर राहून, दुष्काळाचा सामना करत आणि विविध संस्थांना आलेल्या आर्थिक व प्रशासकीय अडचणींना तोंड देतही या परिवाराने आपला जनाधार कायम राखला. हा विजय केवळ राजकीय रणनीतीचा नाही, तर जनतेच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा आहे.
आज राज्यातील अनेक नामांकित राजकीय घराणी सत्तेच्या सावलीत राहून आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अलीकडील उदाहरण म्हणून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेतले जाऊ शकते. त्यांनी उघडपणे कबूल केले की, सत्ता नसल्यास विकासकामांसाठी निधी मिळत नाही आणि परिणामी जनतेशी असलेले नाते कमकुवत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळण्यामागेही त्यांनी हेच कारण सांगितले.
आजच्या राजकारणात विकासकामांसाठी, निधीसाठी आणि प्रशासनावर प्रभाव ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत राहणे आवश्यक मानले जाते. परंतु या समीकरणाला अपवाद ठरलेले घराणे म्हणजे मोहिते-पाटील परिवार.
विरोधात बलाढ्य पक्ष, सत्ता, पैसा आणि प्रशासकीय यंत्रणा असतानाही जनतेशी असलेली त्यांची नाळ तितकीच घट्ट राहिली आहे. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत त्यांचे शिलेदार विजयी होत राहिले आणि या घराण्याचे राजकीय अस्तित्व अधिक बळकट होत गेले.
आज अर्थकारण, सत्ताकारण आणि राजकीय स्वार्थांनी बरबटलेल्या वातावरणातही जनतेचा मोठा वर्ग मोहिते-पाटील परिवारासोबत उभा आहे, ही बाब निश्चितच दखलपात्र आहे. जनतेचे हे प्रेम, हा विश्वास आणि हा पाठिंबा कोणत्याही राजकीय समीकरणापेक्षा मोठा आहे.
मात्र प्रेम करणारा जनसागर कायम बांधून ठेवणे ही तितकीच कठीण गोष्ट असते. आतापर्यंत या परिवाराने ते यशस्वीपणे साध्य केले आहे. भविष्यातही हे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी अधिक संघर्ष, अधिक जनसंपर्क आणि अधिक सक्रियता आवश्यक ठरणार आहे.
जनतेशी असलेली नाळ सैल होण्याआधी ती अधिक घट्ट करण्यासाठी नव्या रणनीती, नवी नेतृत्वशैली आणि नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण राजकारणात सत्ता मिळवणे जितके कठीण असते, त्यापेक्षाही कठीण असते जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणे.
आणि हे स्थान मिळवणाऱ्या मोजक्या राजकीय घराण्यांमध्ये मोहिते-पाटील घराण्याचे नाव निश्चितच अग्रक्रमाने घेतले जाईल.



