माढा जिंकणे हेच लक्ष ; शिवतेजसिंह यांच्या पोस्ट मुळे चर्चेला उधाण, समर्थकांमध्ये मात्र उत्साह

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसतानाही मोहिते-पाटील परिवार पायाला भिंगरी लावून संपूर्ण माढा मतदार संघ पिंजून काढत आहे अशातच युवा नेते व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा फोटो असलेल्या ‘माढा जिंकणे हेच लक्ष’ या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले असून मोहिते-पाटील समर्थकांमध्ये उत्साह संचारलेला दिसत आहे.
शिवतेजसिंहांच्या फोटोमुळे पोस्टला महत्व
अकलूज गावचे सरपंच राहिलेल्या शिवतेजसिंह यांनीही गेल्या काही वर्षात माढा विधानसभा मतदार संघात चांगलाच संपर्क वाढवला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर भेटी गाठी घेण्याबरोबरच मोहिते-पाटील समर्थकांची ताकद वाढवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदार संघात शिवतेजसिंह यांना मानणारा व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा प्रचंड मोठा गट निर्माण झाला आहे. अशातच भविष्यात ‘माढा जिंकण्याचे त्यांचे लक्ष’ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारे असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
सध्या भारतीय जनता पक्षात असलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गेल्या वर्षेभरापासून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. गेल्या काही महिन्यात तर त्यांनी संपूर्ण माढा मतदार संघ तिन ते चार वेळा पालथा घातला आहे. असे असतानाही पक्षाकडून उमेदवारी नाकारली गेल्याने मोहिते-पाटील परिवारापेक्षा त्यांच्या समर्थकांमध्येच प्रचंड नाराजी पसरलेली पहायला मिळाली आणि आता धैर्यशील मोहिते-पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या.
अशातच काही वेळा पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहिर केली असून यामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचा समावेश असलेला दिसत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील परिवारासोबत अंतिम चर्चा करून माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
असे असतानाच काल पासून सोशल मिडीयावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचे फोटो असलेल्या व “मी सज्ज, मी दक्ष, माढा जिंकणे हेच लक्ष…” या कॅप्शनच्या व्हायरल पोस्टमुळे धैर्यशील मोहिते-पाटील माढा लढणारच हे सिध्द झाले आहे.