Latest News

शिक्षण प्रसारक मंडळ करणार ३० हजार भाकरीचे वाटप ; वारकऱ्यांना अन्नदान, ११ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात

अकलूज :  येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतून  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे ३० हजार भाकरी व १२५ किलो बेसनाचे पिठले, ठेचा लोणचे अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे ११ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत.

             शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी सन २०१५ पासून संस्थेच्या वतीने वैष्णवांना अन्नदान करण्याची सुरुवात केली. तीच परंपरा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सदस्या  कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  

          श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. १२ जुलै रोजी अकलूज(जि.सोलापूर) येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी(जि.पूणे) येथे असतो. सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन किलोमीटर असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येत असतात. आदल्या दिवशी मुक्कामास येणाऱ्या वैष्णवांना अन्नदान व्हावे, त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा या हेतूने  जयसिंह मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अन्नदानाला  सुरुवात केली. अन्नदान वाटपाचे हे १० वे वर्ष असून याही वर्षी दि. ११ जूलै रोजी दुपारी ३-३० वाजता अकलूज- सराटी महामार्गावरील अकलूज हद्दीत शिक्षण प्रसारक मंडळ अन्नदान करणार आहे. या मध्ये सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ९ हजार विद्यार्थी अन्नदानात सहभागी होणार आहेत. यामध्ये २१ हजार भाकरी, ७० किलो पिठाचे बेसन पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असा ग्रामीण भोजनाचा आस्वाद देणार आहेत.   

   तसेच संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज सदाशिवनगर यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मांडवे (ओढा) विसावा येथे दिनांक १२ जूलै रोजी सकाळी ९ वाजता ५ हजार भाकरी व २५ किलो बेसन, ठेचा, लोणचे असे अन्नदान होत असून यामध्ये सुमारे १ हजार३०० विद्यार्थी सहभागी होत आहेत. मागील १८ वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.  प्रशाला समितीचे सर्व सदस्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

         वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, प्राथमिक, माध्यमिक विभाग व अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवासाठी दि.१३ जूलै रोजी सकाळी १० वाजता ४ हजार भाकरी, २५ किलो बेसन, ठेचा, लोणचं असे अन्नदान होत असून याकरिता १ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी प्रशाला समितीचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 यावेळी मुख्याध्यापक संजय गळीतकर, अमोल फुले, मुख्याध्यापिका सौ सुनीता वाघ, प्राचार्य राहुल सुर्वे, मुख्याध्यापक शिवाजी पारसे, प्र मुख्याध्यापक अनिल पिसे, विजय निंबाळकर, दत्तू सरतापे, प्राचार्य मनोज नांगरे उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!