बहुजन सत्यशोधक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सौरभ वाघमारे, कार्याध्यक्षपदी हेमंत कांबळे यांची निवड

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज (ता. माळशिरस) येथे बहुजन सत्यशोधक संघाच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार सौरभ वाघमारे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी तर हेमंत कांबळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ही निवड केवळ पद नसून सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत संविधान, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच बहुजन महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित, शोषित व पीडित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी संविधानिक मार्गाने संघर्ष करणे आणि शासन-प्रशासनाकडे त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे यासाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बहुजन सत्यशोधक संघ गेल्या अनेक वर्षांपासून संविधान, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांसाठी कार्यरत असून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजहित चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



