Latest News

पालखी महामार्गाच्या अधिग्रहणाला भ्रष्टाचाराची किड? ; उचित मोबदला न मिळालेल्यांकडून आरोपांच्या फैरी, कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या टक्केवारीचीही चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज

माळशिरस तालुक्यातून जाणार्‍या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूसंपादन अगदी सुरूवातीपासूनच चर्चेचा विषय बनले आहे. यापुर्वीही महर्षि डिजीटल न्यूज ने वारंवार चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना उचित मोबदला न मिळालेल्यांकडून आरोपांच्या फैरू झडू लागल्या आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेतील अनेकांचे ‘कारनामे’ चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया कडून संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्च ही डेड लाईन दिली असल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम वेगात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु जमिन अधिग्रहणातील काही बाबी गेल्या 4 वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे काही ठिकाणी महामार्गाच्या कामाला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. हि प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी भूसंपादन विभागही अ‍ॅक्शन मोडवर आला असून त्यासाठी आता पोलिस यंत्रणेच्या मदतीने प्रसंगी बळाचा वापर करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

असे असताना अधिग्रहण होत असलेल्या जमिन मालकांच्या बाजूने मात्र कोणीही उभे राहताना दिसत नाही. त्यांना त्यांच्या जमिनीचा, घराचा, झाडाचा किंवा पाईपलाईनचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारींचा गेल्या चार वर्षात निपटारा झालेला नाही. भूसंपादन प्रक्रियेत असलेल्या कर्मचार्‍यांना ज्यांनी हाताशी धरले, आर्थिक रसद पुरविली अशा लोकांचे अपेक्षेपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा जास्त रक्कमा त्यांना मिळाल्याचे लोक आता उघडपणे बोलू लागले आहे. यामध्ये कोण-कोणत्या कंत्राटी कर्मचार्‍याचा सहभाग आहे, कोण एजंट आहे याबाबतही महर्षि डिजीटल न्यूजकडे तक्रारी येवू लागल्या आहेत.

तत्पूर्वी नव्यानेच रूजू झालेल्या प्रांतअधिकारी तथा भूसंपादन अधिकारी विजया पांगारकर यांनी नागरीकांच्या अडचणी व वस्तुस्थिती समजून घेऊन अधिग्रहण प्रलंबित राहिलेल्या शेतकरी व जमिन मालकांना योग्य न्याय द्यावा व भ्रष्ट कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी अशी मागणी करण्यात येवू लागली आहे.

सवतगव्हाण येथील दोन मजली इमारतीचा मोबादला देऊनही पुन्हा मुल्यांकन करण्याचा कोण करतंय प्रयत्न उद्या वाचा सविस्तर वृत्तांत (क्रमश:)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!