खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिफारस केलेल्या कामांना निधीच नाही ; सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील चार नगरपरिषदा निधीच्या प्रतिक्षेत
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : मोहिते-पाटील यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेत असल्यामुळे टिकेचे धनी होत असलेल्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सहा ते सात महिन्यापूर्वी खासदार महोदयांनी सोलापूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी दोन कोटींचा निधी देण्याबाबत शिफारस केली होती परंतु अद्याप सदरच्या कामांसाठी एक रूपयाचाही निधी उपलब्ध झाला नसल्याने हे खासदार फक्त कागदोपत्री स्टंटबाजी करणारे खासदार असल्याची चर्चा सुरू झाली असून यामुळे त्यांच्याबाबतच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत महर्षि डिजीटल न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपरिषदेकरीता 2 कोटींचा निधी मंजूर होण्याबाबत शिफारस केली होती. त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सदरचा निधीही मंजूर झाला परंतु चार वर्षे आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कुर्डुवाडी, अकलूज, सांगोला या गावाकडे डुंकूनही पाहिले नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी फलटण नगरपरिषदेचा निधी सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांना वळविण्याचा निर्णय घेतला.
परंतु 16 मे 2023 रोजी करमाळा नगरपरिषदेसाठी 50 लाख, कुर्डुवाडी नगरपरिषदेसाठी 30 लाख, अकलूज नगरपरिषदेसाठी 70 लाख व सांगोला नगरपरिेदेसाठी 50 लाख या प्रमाणे एकुण 2 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे खासदार असताना त्यांनी याबाबतच्या बातम्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या माध्यमातून वृत्तपत्रांकडे प्रसिध्दीस दिल्या होत्या.
असे असले तरी अद्याप सदरच्या कामांना एक रूपयांचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यांनी प्रस्तावित केलेली कामे आज सुरू होतील, उद्या सुरू होतील या आशेवर बसलेल्या नागरीकांचा मात्र खासदारांवरचा पुरता विश्वास उडालेला आहे. याउलट महर्षि डिजीटल न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार फलटण नगरपरिषदेकडून सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांना वळविण्याबाबतच्या निधीची फलटण नगरपरिषदेने अगोदरच विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांना निधी कोठून येणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.