नातेपुतेत मटका, जुगार हातभट्टीचा बाजार, पोलिसांकडून कारवाई मात्र नकार!”

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : “चोरी चोरी, चुपके चुपके” या स्टाईलने माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे दाटपणे सुरू आहेत. आमदार उत्तमराव जानकर यांनी विधानसभेत थेट आवाज उठवूनही अद्यापही कारवाईच्या नावाखाली केवळ देखावा सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
हातभट्टी दारूचा पुरवठा हा नातेपुते परिसरात धर्मपुरी, गुरसाळे या भागांतील जंगल परिसरात उभारलेल्या गुप्त भट्ट्यांमधून नियमित सुरू आहे. विशेष म्हणजे या भट्ट्यांचे ‘नेमके ठिकाण’ अनेकांना ठाऊक असताना पोलिसांना ‘माहित नाही’ हे आश्चर्यच म्हणावे लागेल!
गुटखा, मावा, आणि मोबाईलवर चालणाऱ्या मटक्याचा सुळसुळाट हा नातेपुतेच्या बाजारपेठेसह उपनगरांपर्यंत पोहोचला आहे. चक्री मटक्याचे अड्डे दोन-तीन ठिकाणी बिनधास्त सुरू असून स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोबाईल अॅप्स व व्हॉट्सअॅप ग्रुपवरून आकडे स्वीकारले जात असून, गावात काही विशिष्ट नावं या अवैध धंद्यांची ‘ब्रँडेड एजंट’ म्हणून ओळखली जात आहेत.
नातेपुते पोलिस ठाण्याच्या दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांना बळ मिळत असून, सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे या व्यवसायांमुळे तरुण पिढी नष्ट होत असून कुटुंबव्यवस्था ढासळत चालली आहे.
लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतरही जर पोलीस यंत्रणा गप्प असेल, तर मग ह्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा का, असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. खऱ्या अर्थाने धडक कारवाई करून गुन्हेगारीला मुळासकट उखडून टाकण्याची मागणी आता गावपातळीवरून जोर धरू लागली आहे.



